अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार; 12 मार्चला क्रू- 10 मिशन होणार लाँच

हिंदुस्थानी वंशाची अमेरिकन अंतराळवीर आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर मागील 8 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले आहेत. त्यांना पृथ्वीवर परत आणण्याची तयारी सुरू आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, ते सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पूर्वी घोषित केलेल्या वेळेपेक्षा काही आठवडे आधीच पृथ्वीवर आणू शकतात. याआधी त्यांच्या परतीची  अंतिम मुदत मार्च किंवा एप्रिलच्या अखेरीस अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र आता त्याच्या आधी दोघे अंतराळवीर पृथ्वीवर परत येण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या परतीसाठी 12 मार्चला क्रू- 10 मिशन होणार लाँच होणार आहे.

कॅप्सूलमधून येणार

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करताना सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्याची घोषणा केली. या मिशनसाठी  एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची मदत घेतली जाणार आहे. यासाठी जुन्या स्पेसएक्स ड्रगन कॅप्सूलचा वापर करण्यात येणार आहे. 12 मार्च रोजी नासा स्पेसएक्सच्या ड्रगन कॅप्सूलमधून क्रू-10 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवेल. त्यात अंतराळवीर अॅन मॅक्क्लेन, निकोल आयर्स, ताकुया ओनिशी आणि रोसकॉसमॉस हे सहभागी होणार आहेत. या कॅप्सूलमधून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणले जाईल. त्यानंतर त्यांचा गेल्या आठ महिन्यांपासूनचा अंतराळ स्थानकातील प्रवास थांबणार आहे. परतल्यानंतर त्या त्यांच्या अद्भुत प्रवासातील अनेक गोष्टी उलगडून दाखवतील.

पृथ्वीवर कोणत्या अडचणी येतील?

पृथ्वीवर परतल्यावर सुनीता विल्यम्स यांना काही अडचणी येतील. त्यांना सामान्य होण्यासाठी साधारणपणे 45 दिवस ते काही महिने किंवा एक वर्षही लागू शकते. ते अंतराळात किती काळ होते यावर अवलंबून आहे. अंतराळात आपले स्नायू नेहमी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध कार्य करतात. अंतराळवीर तेथे उडत राहतात. अशा स्थितीत दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने स्नायू कमकुवत होऊ लागतात. त्याच वेळी हाडांची घनता दरमहा 1 टक्के कमी होते. अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर बराच काळ चालण्यात अडचण येते. अशा परिस्थितीत पृथ्वीच्या वातावरणाशी जुळवून घेणे आणि परत येणे आव्हानात्मक आहे.