
हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स नऊ महिन्यांनंतर नुकत्याच पृथ्वीवर परतल्या. चार दशकांपूर्वी हिंदुस्थानी अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळातून ‘सारे जहाँ से अच्छा’ असे म्हटले होते. त्याच आठवणींना उजाळा देत सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून हिमालय पर्वताचे दृश्य अविश्वनीय असल्याचे म्हटले. तसेच सुनीता यांनी मुंबई आणि तिथल्या मच्छीमारांचाही आवर्जून उल्लेख केला. सुनीता म्हणाल्या, ‘अद्भुत, अगदी अद्भुत! हिंदुस्थान खूप सुंदर आहे. जेव्हा आम्ही हिमालयाच्या वरून जात होतो तेव्हा बुचसह इतर अंतराळवीरांनी अविश्वसनीय फोटो काढले, ते दृश्य खूपच छान होतं.’ त्या पुढे म्हणाल्या, ‘हिंदुस्थान अनेक रंगांचं मिश्रण आहे. मला वाटतं जेव्हा तुम्ही पूर्वेकडून गुजरात आणि मुंबईकडे जाता आणि तेव्हा तिथल्या किनाऱयाजवळील मासेमारी करणाऱया जहाजांवरून तुम्हाला ‘आपण पोहचलो आहोत’ असा इशारा मिळतो. संपूर्ण हिंदुस्थानात दिव्यांचे एक नेटवर्क होतं. मोठय़ा शहरांपासून लहान शहरांपर्यंत, रात्रीच्या वेळी ते पाहणे खूपच सुंदर होतं. दिवसा हिमालयामुळं हिंदुस्थान अधिकच खास दिसत होता.’
हिंदुस्थानला लवकरच भेट देणार
सुनीता विल्यम्स यांना हिंदुस्थानच्या अंतराळ कार्यक्रमात मदत करण्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, मला आशा आहे की आम्ही लवकरच भेटू आणि आमचे अनुभव हिंदुस्थानातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू. कारण हा एक महान देश आहे आणि आणखी एक तिथं अद्भुत लोकशाही आहे. ते अंतराळ क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला त्यात सहभागी होऊन त्यांना मदत करायला आवडेल.’