आपल्याला ठाऊक आहे की दीड महिना झालाय, सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले आहेत. त्यांना स्पेस स्टेशनवर घेऊन गेलेल्या बोईंग स्टरलायनर यानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दोन्ही अंतराळवीरांचे पृथ्वीवर येणे लांबले आहे. या वेळेचा फायदा घेत सुनीता विल्यम्स अंतराळात रोपट्यांना कशा प्रकारे पाणी द्यायचे यावर शोध घेत आहेत. अंतराळातील भारविहीन अवस्थेत रोपट्यांच्या मुळांना पाणी कसे मिळते, यावर ते प्रयोग करत आहेत. त्यासाठी विविध आकारांच्या रोपट्यांचा आणि पाणी देण्याच्या पद्धतींचा त्या अभ्यास करत आहेत. या अभ्यासामुळे भविष्यात अंतराळ स्थानकात रोपटय़ांची लागवण करणे सोपे जाईल.
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बच विल्मोर 5 जून रोजी अंतराळात गेले. बोईंग स्टरलायनर यानातून त्यांनी झेप घेतली होती. यानात हेलियमची गळती होऊन तांत्रिक बिघाड झाल्यानंतर अंतराळवीरांना परत आणण्याची मोहीम रद्द करण्यात आली. जोपर्यंत यानाचा बिघाड पूर्णपणे दुरुस्त केला जाणार नाही, तोपर्यंत दोघांना परत आणता येणार नाही, असे नासाने सांगितलंय.