
जेव्हा कामाचे तास वाढतात, तेव्हा बहुतांश कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइमचे पैसे मिळतात. हिंदुस्थानी वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी अंतराळात नऊ महिने घालवले, पण त्यांना कोणताही अतिरिक्त पगार वा ओव्हरटाइमचे पैसे मिळणार नाहीत. नासाच्या नियमांनुसार त्यांना फक्त पाच अमेरिकन डॉलर एवढा भत्ता मिळेल.
यासंदर्भात नासाचे प्रवत्ते जिमी रसेल म्हणाले, ‘‘अंतराळात राहूनही या कर्मचाऱ्यांना संघीय कर्मचारी समजले जाते. त्यांचा दौरा हा अधिकृत प्रवास ऑर्डरवर असतो. ते पृथ्वीवर असू दे किंवा अंतराळात त्यांना त्यांचे निर्धारित वेतन मिळते.’’
नासाच्या नियमांनुसार, अंतराळवीरांना प्रवास, भोजन आणि राहण्याची सुविधा मिळते. मात्र कुठलेही ओव्हरटाईम, सुट्टी किंवा विकेंडचा पगार मिळत नाही. फक्त 5 डॉलरचा इंसिडेंटसल्स भत्ता दिला जातो, जो प्रवासातील छोटय़ा-मोठय़ा खर्चासाठी असतो. या हिशेबाने सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना 286 दिवसांसाठी सुमारे 1430 डॉलर मिळाले.