हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बच विल्मोर एक महिन्याहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकून पडले आहेत. ते पृथ्वीवर कधी परतणार, याची जगाला प्रतीक्षा आहे. अशातच बोईंग स्टारलाइनर आम्हाला लवकरच भूतलावर सुखरूप आणेल, असा विश्वास सुनीता विल्यम्स आणि बच विल्मोर यांनी बुधवारी व्यक्त केला.
सुनीता विल्यम्स आणि बच विल्मोर हे नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचा एक भाग म्हणून स्टारलाइनर अंतराळ यानातून उड्डाण करणारे पहिले प्रवासी आहेत. युनायटेड लाँच अलायन्स या रॉकेट कंपनीच्या अॅटलस-5 रॉकेटवर हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात पाठवले होते. दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर, बोईंग स्टारलाइनर 5 जून रोजी दोन्ही अंतराळवीरांसह अंतराळाच्या दिशेने झेपावले होते. हे अंतराळयान 26 जूनला पृथ्वीवर परतणार होते. दोन्ही अंतराळवीर जवळपास आठवडाभर अंतराळात राहणार होते, परंतु प्रवासादरम्यान थ्रस्टर खराब झाल्याने आणि हेलियम गॅस गळतीमुळे त्यांचे परतणे पुढे ढकलण्यात आले. प्रवासादरम्यान अंतराळ यानात पाच ठिकाणांहून हेलियमची गळती होत असल्याचे आढळले होते. पाच थ्रस्टरचे कार्यही थांबले होते.
l नासाच्या शास्त्रज्ञांनी सुनीता आणि विल्मोर यांच्या परत येण्याची कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, परंतु जुलैच्या अखेरीस दोघेही पृथ्वीवर परत येतील, असे शास्त्रज्ञांना वाटते.
l तथापि, स्टारलाइनर टीमवर पूर्ण विश्वास असून अंतराळ यानाच्या थ्रस्टरमधील बिघाड दूर करून ते आम्हाला सुखरूप घरी परत आणतील, असे सुनीता आणि विल्मोर यांनी बुधवारी सांगितले. अंतराळयान आम्हाला सुखरूपपणे घरी आणेल, याच कोणतीही अडचण नाही, अशी चांगली भावना माझ्या मनात असल्याचे सुनीता विल्यम्स म्हणाल्या.
वादळाचे चक्रीवादळ होताना…
सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात थक्क करणारी गोष्ट बघितली. त्यांना एका लहान वादळाचे रूपांतर चक्रीवादळात होताना दिसले. सुनीता आणि विल्मोर यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी हा अनुभव शेअर केला. ‘आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱयावर वादळ दिसले. दीड आठवडय़ात त्याचे रूपांतर टेक्सासला प्रभावित करणारा शक्तिशाली बेरील चक्रीवादळात झाले. त्या वादळाचा मी पह्टो काढला होता. त्या वादळाचे पुढे चक्रीवादळ झाले, हे खात्रीने सांगू शकते,’ असे सुनीता विल्यम्स म्हणाल्या. सध्या सुनीता आणि विल्मोर दोघे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात रोजच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. ते विविध जबाबदारी पार पाडत आहेत. त्याचे प्रयोग करणे सुरू आहे. युरीनपासून पिण्याचे पाणी तयार करणाऱया मशीनवरील पंप बदलणे, मायक्रो-ग्रॅविटी वातावरणात जीन सिक्वेन्सिंग प्रयोग अशी कामे ते करत आहेत.