भिंडेशी संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देईन, नाहीतर तुम्ही द्या! सुनील राऊत यांचे सभागृहात चॅलेंज

शिवसेनेचा एक आमदार भिंडेला घेऊन मातोश्रीवर गेला होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला. आमदार सुनील राऊत यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी या वेळी करताच गटनेते अजय चौधरी यांच्यासह शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. सभागृहात नावाचा उल्लेख कसा केला, असे म्हणत त्यांनी तालिका अध्यक्षांकडे कारवाईची मागणी केली. सुनील राऊत यांनी तर भर सभागृहात चॅलेंज दिले.

घाटकोपरची होर्डींग दुर्घटना दुर्दैवी आहे. पण संबंध नसताना माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला गेला. मी चॅलेंज देतो. भिंडेशी मी एक रुपयाचाही व्यवहार केल्याचे सिद्ध झाले तर इथल्या इथे राजीनामा देईन. अन्यथा आरोप करणाऱयांनी राजीनामा द्यावा, असे आमदार राऊत म्हणाले. चुकीच्या पद्धतीने ईडी लावून इतरांच्या चौकशा करता ना, मग दुर्घटनेनंतर भिंडे पळाला तेव्हा त्याला शेवटचे चार पह्न कुणाचे आले होते त्याचीही चौकशी करा. मुलुंडच्या एका माजी खासदाराचे ते पह्न होते, असे सांगतानाच, खोटे आरोप कुणी करत असेल तर त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सुनील राऊत यांनी केली.