
जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमधील आयसीयू गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे जोगेश्वरी, अंधेरी, मालाड, गोरेगावमधील लाखो रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. रुग्णालयातील आयसीयू त्वरित सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत हरकतीच्या मुद्द्यांद्वारे सुनील प्रभू यांनी सरकारचे लक्ष वेधले. जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कंत्राटदाराने आयसीयू बंद करून डॉक्टर्स नर्स, कर्मचाऱयांसोबत पलायन केले. त्यात 13 रुग्ण अडकले. तेरापैकी पाच रुग्ण अत्यवस्थ होते. आयसीयूतील कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत होते. पंत्राटदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता काम बंद केले. आयसीयू बंद आहे. स्थानिक आमदार बाळा नर यांनी वैद्यकीय अधीक्षकांशी संपर्क साधला, पण उत्तर मिळाले नाही. मी स्वतः पालिका आयुक्तांशी बोललो मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी या सर्व परिसरातली रुग्ण या रुग्णालयात उपचारांसाठी येतात. एखाद्या रुग्णाला हार्टअॅटॅक आला किंवा रुग्ण अत्यवस्थ झाला तर रुग्णाला या रुग्णालयात दाखल केले जाते; पण आयसीयू बंद झाल्याने जनतेचे मोठय़ा प्रमाणावर हाल होत आहेत. आयसीयू त्वरित सुरु करावे. वीस ते पंचवीस लाख लोकांचे हाल होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणले. त्यावर शासनाने यावर कार्यवाही करावी, असे आदेश तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी दिले.