लोकप्रतिनिधींचा अंकुशनसल्यामुळे महापालिका प्रशासन ढिम्म! कुरारमधील रस्त्यांची दुरवस्था पाहून सुनील प्रभू यांनी व्यक्त केला संताप

दिंडोशी विधानसभेतील पश्चिम द्रुतगती महामार्ग ते आप्पापाडा येथील रस्त्याच्या दुरुस्ती, काही ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या तर काही ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या नव्याने टाकण्याची कामेदेखील सुरू आहेत. मात्र, हे सर्व करत असतानाच दुसरीकडे अतिवृष्टीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन वाहनचालक, रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेवर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे पालिका प्रशासन ढिम्म झाले असून समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करताना दिसत नाही, असा संताप शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केला.

सुनील प्रभू यांनी आज दिंडोशी विधानसभेतील पश्चिम द्रुतगती महामार्ग भुयारी मार्ग ते आप्पापाडा येथील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी महापालिका अधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि मोठय़ा संख्येने शिवसैनिक, कार्यकर्ते, स्थानिक उपस्थित होते. रस्त्यांवर जे खड्डे आहेत ते बुजवावेत, रस्त्यावर पडलेले कचऱयाचे ढीग घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत तत्काळ उचलावेत, अशा सूचना प्रभू यांनी केल्या.

…म्हणून कामात दिरंगाई
पालिकेत नगरसेवक नसल्याने प्रशासनावर स्थानिक लोकप्रतिनिधींचा अंकुश नाही. यामुळेच रस्त्यांवरील खड्डे, कचरा, पर्जन्य जलवाहिन्या साफ नसणे यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. प्रशासक नेमल्यामुळे लोकप्रतिनिधींचा धाक राहिलेला नाही. यामुळेच महापालिका अधिकारी दिरंगाई करत आहेत. याला सर्वस्वी पालिक प्रशासक आणि राज्य सरकार जबाबदार आहेत असे सुनील प्रभू म्हणाले.