संजय गांधी उद्यानातील 25 हजार झोपडीधारकांना मुंबईतच पर्यायी घरे द्या! सुनील प्रभू यांची आग्रही मागणी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जमिनीवरील काही झोपडपट्टीधारकांना घरे दिली आहेत, पण काहींना घरे मिळालेली नाहीत. आरेच्या जमिनीवर पुनर्वसन करण्याचे आश्वासन म्हाडाने दिले होते, पण तो भाग ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ असल्याने त्यांचे पुनर्वसन होऊ शकत नाही. सध्या 2011 पर्यंतच्या जनगणनेला मान्यता दिली आहे, मात्र अशा 25 हजार घरांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे या झोपडपट्टीवासीयांना मुंबईत कायमस्वरूपी मोफत घरे द्यावीत, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना केली.

वन विभागात सातत्याने आगी लागतात. वन विभागाच्या बाजूला खासगी भूखंड आहेत. त्यावरील वनांवरही सातत्याने आगी लागतात. या आगी लागण्यामागचे कारण काय आहे? या बिल्डर आगी लावतात, याचा तपास करण्याची मागणी केली.

शाळांचे अनुदान मार्गी लावा

शाळांच्या अनुदानाच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, 92 शाळांना अनुदान मिळालेले नाही. दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील भारतमाता विद्यालयाची अनुदानाची फाईल प्रलंबित आहे. त्याला त्वरित मंजुरी देऊन अनुदानाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी त्यांनी केली. राज्यात सध्या तापमान सरासरी 27 ते 42 अंश सेल्सिअस आहे. या उष्माघाताचा विद्यार्थ्यांना त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शाळेच्या परीक्षा घेण्याची मागणी त्यांनी केली.

मराठी ज्ञानभाषा

मराठी भाषा केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला. जोपर्यंत मराठी शाळांचे सक्षमीकरण होत नाही. मराठीत शिक्षण दिले जात नाही आणि मराठी ज्ञानभाषा होत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. मराठी ज्ञानभाषा ही रोजगाराची भाषा व्हावी, मराठी भाषा धोरणातील तरतुदीची अंमलबजावणी व्हावी, केंद्र शासनाची कार्यालये, बँका रेल्वे, विमानतळ, पोस्ट ऑफिसमध्ये दर्शनी भागात सूचना फलक अर्जाचे नमुने मराठी भाषेत सक्तीचे करणे गरजेचे आहे. सरकारने मराठी भाषेचे नाट्य कलादालन रद्द केले ही दुर्दैवाची बाब आहे. मराठी भाषा भवनाची आजची परिस्थिती काय आहे, असा सवाल त्यांनी सरकारला केला.