सराव सामन्याशिवाय खेळणाऱ्या हिंदुस्थानी संघाला गावसकरांचा दम

मायभूमीत न्यूझीलंडकडून दारुणरीत्या पराभूत झालेला हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटींच्या महामालिकेपूर्वी एकही सराव सामना खेळणार नसल्याचे कळताच महान फलंदाज सुनील गावसकरांनी संघाला पुन्हा दम दिला आहे. इतका मोठा दौरा असताना पर्थ कसोटीपूर्वीचा सराव सामना रद्द करणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. 22 नोव्हेंबरपासून हिंदुस्थान पर्थवर पहिली कसोटी खेळणार असून त्यापूर्वी एक चारदिवसीय सराव सामना खेळणार होता, जो कर्णधार रोहित शर्माने रद्द करत नुसता सराव करण्यावर भर दिला आहे. याचाच अर्थ हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱयात प्रथमच एकही सराव सामना न खेळताच कसोटी युद्धासाठी मैदानात उतरणार आहे.

गावसकरांनी आपल्या लेखात आपला राग व्यक्त करताना म्हटले आहे, हिंदुस्थानी क्रिकेटसाठी ज्याने सराव सामना रद्द करत ऑस्ट्रेलियन पंतप्रधान एकादशविरुद्ध पहिल्या आणि दुसऱया कसोटीदरम्यान दोनदिवसीय सराव सामन्याचे आयोजन करण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरावा. न्यूझीलंडविरुद्ध ज्या पद्धतीने हिंदुस्थानी फलंदाजांनी खेळ केला, ते पाहता ऑस्ट्रेलियात सराव सामन्याची गरज होती. प्रामाणिकपणे सांगायचे तर हिंदुस्थानी फलंदाजी केवळ बंगळुरूत दुसऱया डावातच दिसली. पुढील दोन्ही कसोटींत फिरकी आक्रमणापुढे शरणागती पत्करली. पुणे आणि मुंबईच्या खेळपट्टीवर चेंडू वळत होते, पण त्यावर खेळणे अशक्य नव्हते, असेही गावसकरांनी आपल्या लेखात लिहिले.