यजमान ऑस्ट्रेलियाने दहा वर्षांचा दुष्काळ संपवत अखेर बॉर्डर-गावसकर करंडकावर आपले नाव कोरले. हिंदुस्थानचे कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, लोकेश राहुल, शुबमन गिल हे स्टार फलंदाज या ऑस्ट्रेलिया दौऱयावर फ्लॉप ठरले. त्यामुळे सुनील गावसकर व इरफान पठाणसारख्या माजी क्रिकेटपटूंनी स्टार खेळाडूंवर टीका केली. ‘आता तरी सुधारा आणि देशांतर्गत क्रिकेट खेळा,’ अशा शब्दांत त्यांनी या स्टार क्रिकेटरचे कान टोचले.
कोचिंग स्टाफ काय करतोय?
मायदेशात न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत 0-3 फरकाने पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. ऑस्ट्रेलिया दौऱयावर तर भरवशाचाच खेळाडूंनी निराशा केली. तुम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळत नाही, हे पराभवाचे मुख्य कारण आहे. दुसरे म्हणजे टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ काय करतो? असा सवाल सुनील गावसकरांनी उपस्थित केला. कामगिरीत सुधारणा होत नसेल तर कोचिंग स्टाफला तरी कायम का ठेवायचा? असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोहलीला संघात खेळण्याचा अधिकारच नाही
‘बॉगाक’ गमाविल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इरफान पठानने रोहित शर्मा व विराट कोहली यांना या पराभवाबद्दल जबाबदार धरले. सुनील गावसकर यांच्यासोबत ब्रॉडकास्ट पॅनलवर चर्चा करताना इरफान पठाणने कोहलीने स्थानिक क्रिकेट खेळायला हवे या गोष्टीकडे लक्ष वेधले. ‘हिंदुस्थानी क्रिकेटला सुपरस्टार कल्चर नकोय, तर टीम कल्चरची गरज आहे. कोहलीने 2012 मध्ये अखेरच्या वेळी रणजी क्रिकेट खेळले होते. महान खेळाडू सचिन तेंडुलकरला गरज नसतानाही ते स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत होते. सचिनकडून आताच्या स्टार खेळाडूंनी काहीतरी शिकायला हवे. कोहलीने देशासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे, मात्र गेल्या पाच वर्षांत त्याची कामगिरी अत्यंत वाईट झालीय. त्याची सरासरी 30 धावांपेक्षा खाली आली. अशा अपयशी कामगिरीनंतर इतक्या महान खेळाडूने संघात खेळायला नको. त्याने आता युवा खेळाडूंना संधी दिले पाहिजे. तेसुद्धा 25-30 च्या सरासरीने धावा काढतील. तेच टीम इंडियाचे उद्याचे भविष्य आहेत, त्यांना घडविण्यावर लक्ष द्यायला हवे, असे परखड मतही इरफान पठाणने व्यक्त केले.