हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा दारुण पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागलाय. या पराभवानंतर महान क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावसकरांनी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अपयशी फॉर्मवर जोरदार टीका केली. देशांतर्गत क्रिकेटपासून नेहमीच अंतर राखणाऱ्या या दिग्गज खेळाडूंनी आता तरी देशांतर्गत क्रिकेट खेळावे असा सल्ला दिला होता. गावसकरांच्या टीकेनंतर स्वतःचा हरवलेला फॉर्म मिळवण्यासाठी दिग्गज खेळतील की नाही ते लवकरच कळेल, पण दिग्गज आणि महान खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट पाहायला मिळणार या नुसत्या कल्पनेने क्रिकेटप्रेमींचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.
येत्या 23 जानेवारीपासून पुन्हा एकदा रणजी करंडकाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होत असून यात ऑस्ट्रेलियात अपयशी ठरलेल्या अनेकांना पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना पाहता येणार आहे. रविवारीच सिडनीवर हिंदुस्थानी फलंदाजी फेल झाली आणि आपल्या संघाला 3-1 ने लाजीरवाणा पराभव सहन करावा लागला. एक बुमरा सोडला तर हिंदुस्थानच्या एकाही खेळाडूमध्ये ना गोलंदाजीत सातत्य दिसले, ना फलंदाजीत. पूर्ण मालिकेत सारे स्टार दोन-चार डावांपुरतेच मर्यादित राहिले. सर्वाधिक 391 धावा यशस्वी जैसवालच्या बॅटमधून निघाल्या असल्या तरी तो दहापैकी केवळ 3 डावांतच खेळला. केएल राहुलही दोन अर्धशतकांच्या पलीकडे काही करू शकला नाही. या दौऱ्यातून हिंदुस्थानी क्रिकेटला नितीशकुमार रेड्डीच्या रूपाने नवा स्टार मिळाला, पण नितीश मेलबर्नवर संस्मरणीय शतक ठोकल्यानंतर शेवटच्या तीन डावांत 1, 0, 4 असा अपयशी ठरला.
हिंदुस्थानच्या अपयशी खेळाडूंच्या यादीत कर्णधार रोहित शर्मा सर्वोच्च स्थानी आहे. त्याला आपल्या 5 डावांत केवळ 31 धावाच करता आल्या. मग दुसरे नाव येते विराट कोहलीचे. ऑस्ट्रेलिया हे विराटचे दुसरे घर मानले जाते. शुभमन गिल आणि रवींद्र जाडेजानेही सर्वांची निराशा केली. ऋषभ पंतलाही आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नसला तरी त्याने सिडनी कसोटीच्या दोन्ही डावांत केलेल्या खेळय़ा सदैव स्मरणात राहतील इतके मात्र निश्चित आहे.
गावसकरांच्या सल्ल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेले कित्येक क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरतील याबाबत आताच सांगणे कठीण आहे. कारण त्याचदरम्यान इंग्लंडचा संघ टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशी ठरलेल्या काही खेळाडूंपैकी काहींची निवड इंग्लंडविरुद्ध होण्याची शक्यता आहे.