ऑस्ट्रेलियातील हिंदुस्थानी संघाचा दारुण पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागलाय. या लाजीरवाण्या कामगिरीचे पडसाद वर्षाच्या मध्यास इंग्लंड दौऱ्यासाठी हिंदुस्थानी संघ निवडताना जरूर उमटतील आणि तेव्हा निवड समितीने धाडसी निर्णय घेतले तर कसलेही आश्चर्य वाटणार नाही, अशी हिंदुस्थानी संघात मोठे फेरबदल होण्याचे संकेत देणारी प्रतिक्रिया महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर यांनी व्यक्त केलीय.
सिडनी कसोटीत हिंदुस्थानी संघाला कसोटी पराभव, मालिका पराभव आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात अशी तिहेरी नामुष्की एकाच वेळी सहन करावी लागली होती. हिंदुस्थानच्या सिडनी फेलमुळे आता डब्ल्यूटीसीची अंतिम लढत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. ऑस्ट्रेलियातील अपयशामुळे हिंदुस्थानी संघातील अनेक खेळाडू निवड समितीच्या रडारवर आले असून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीबाबत चोहोबाजूंनी टीकांचे बाण सोडले जात आहेत. सिडनी कसोटीत रोहित शर्माने स्वतःलाच विश्रांती देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याच्यावर थेट कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, असा आवाज घुमू लागलाय. तसेच विराट कोहलीच्या गेल्या पाच वर्षांची कसोटीतील अपयशांची मालिकाही डोके वर काढू लागली आहे. आता पुढील सहा महिने हिंदुस्थानी संघ कोणताही कसोटी सामना खेळणार नसला तरी डब्ल्यूटीसीच्या अंतिम लढतीनंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होईल. या महाकसोटी मालिकेसाठी हिंदुस्थानी संघात अनेक मोठे फेरबदल होण्याची शक्यता आतापासून वर्तवली जात आहे. या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघात किमान सहा ते आठ बदल होणार असल्याचे आतापासूनच बोलले जात आहे.
थेट कर्णधारपदापासून सलामीवीर, गोलंदाज, मधली फळी असे अनेक नव्या पर्यायांची शोध निवड समितीला आतापासून करावी लागणार आहे. याची सर्वांना कल्पना असल्यामुळे या महामालिकेसाठी निवड समितीने आगामी डब्ल्यूटीसी हंगामासाठी नव्या टीम इंडियाच्या उभारणीसाठी साहसी निर्णय घेतले तर मला त्याबाबत जराही आश्चर्य वाटणार नसल्याचे खुद्द गावसकरांनी म्हटले आहे. त्यांनी नाव न लिहिता वर्तवलेला अंदाज थेट रोहित-विराटच्या विरोधात होता, हे स्पष्ट आहे. त्यामुळे बीसीसीआयला नव्या संघासाठी हे धाडस दाखवावे लागणार आहे.
संघात फक्त तिघांचेच स्थान पक्के
स्वतःला संघात कायम मानणाऱया अनेक खेळाडूंना या मालिकेपूर्वी धक्के बसण्याची दाट शक्यता आहे. एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलियात खेळलेल्या खेळाडूंपैकी चार-पाच खेळाडूच आगामी महा मालिकेपर्यंत संघात टिकतील, अशीही शक्यता ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी वर्तवत निवड समितीवरील आपला दबाव वाढवला आहे. सध्या संघात असलेल्या यशस्वी जैसवाल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमरा या तिघांचेच स्थान पक्के मानले जात आहे. उर्वरित काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल तर काहींना संघात स्थान मिळवण्यासाठी पुढील पाच महिन्यांत खेळल्या जाणाऱया देशांतर्गत स्पर्धांमध्ये जोरदार कामगिरी करावी लागणार आहे.