सुनील गावसकरांनी शब्द पाळला; विनोद कांबळीला दर महिना 30 हजार रुपये देणार

एकेकाळी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या तोडीस तोड फलंदाजी करणारा टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या आरोग्याच्या समस्येसह आर्थिक अडचणींमध्ये अडकला आहे. त्याच्या या कठीण काळात त्याला आधार देण्यासाठी टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पुढाकार घेत दिलेले अश्वासन पाळलं आहे. विनोद कांबळीला दर महिन्याला 30 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यास सुनील गावसकर यांनी सुरुवात केली आहे.

मागील काही वर्षांमध्ये विनोद कांबळी आरोग्याच्या समस्येसह विविध कारणांमुळे चर्चेच आहेत. तसेच युरीन इन्फेक्शन आणि अंगावर पेटके आल्यामुळे त्याच्यावर काही दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. एकीकडे तब्बेत खालावत होती तर, दुसरीकडे उपचारांसाठी पैशांची कमतरता होती. तेव्हा प्रसारमाध्यमांवरही याविषयी बरीच चर्चा झाली. त्यानंतर मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात सुनील गावसकर यांनी विनोद कांबळीला मदत करण्याचे अश्वासन दिले होते. त्यांनी त्यांच्या अश्वासनाची पुर्तता करत दिलेला शब्द पाळला आहे.

सुनील गावसकर यांनी 1999 साली चॅम्प्स फाउंडेशनची स्थापना केली होती. या फाउंडेशनच्या मदतीने ते गरजू माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मदत करतात. या फाउंडेशनच्या माध्यामातून विनोद कांबळीला आयुष्यभर दर महिना 30 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मासिक 30 हजार रुपयांव्यतिरिक्त कांबळीच्या वैद्यकीय खर्चासाठीही दरवर्षी 30 हजार रुपये देण्यात येणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.