राहुल द्रविडला भारतरत्न द्या; गावसकरांनी केली मागणी

हिंदुस्थानला टी-20 वर्ल्डकपचे जगज्जेतेपद जिंकून देणाऱया मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी खुद्द महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.  द्रविडच्याच प्रशिक्षकपदाखाली हिंदुस्थान वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र हिंदुस्थानला जगज्जेतेपदाचा मुकूट जिंकता आला नव्हता. त्या अपयशानंतर अवघ्या 7 महिन्यांनी द्रविड टीम इंडियाने टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी उचलली. आता अखेर द्रविड चांगल्या आठवणींसह प्रशिक्षकपदावरून दूर झाला आहे.  1983 चा वर्ल्डकप विजेत्या संघाचे सदस्य असलेल्या गावसकर यांनी केंद्र सरकारला विनंती केली की, सरकारने राहुल द्रविडला भारतरत्न देऊन सन्मानित केले तर ते योग्य ठरेल आणि तो त्यास पात्र आहे. तो एक महान खेळाडू आणि कर्णधार होता. वेस्ट इंडिजमध्ये मालिका जिंकणे सोपे नव्हते, त्याने ते करून दाखवले. इंग्लंडला जाऊन इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकणारा तो फक्त तिसरा हिंदुस्थानी कर्णधार होता आणि त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये नवीन प्रतिभा वाढवण्याचे काम केले.