हिंदुस्थानी संघात आता चार-चार सलामीवीर आहेत, पण सलामीला कोणती जोडी उतरणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी हिंदुस्थानचे महान सलामीवीर यांनी विराट कोहलीने स्वतःच सलामीला यावे आणि यशस्वी जैसवालला तिसऱया क्रमांकावर खेळू द्यावे, असा सल्ला दिला आहे. उद्या आयर्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात रोहित शर्मा आणि टीम इंडियाचे संघ व्यवस्थापन गावसकरांच्या सल्ल्याची अंमलबजावणी करतात की नाही ते सामन्यापूर्वीच कळू शकेल.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोहलीने कोणत्या स्थानावर फलंदाजीला यायला हवे यावर आतापर्यंत खूप चर्चा झाली आहे आणि पुढेही होईल. तो अनेक वर्षे पांढऱया चेंडूच्या क्रिकेटमध्ये तिसऱया क्रमांकावरच खेळत आला आहे. मात्र यंदा आयपीएलमध्ये तो सलामीला उतरला आणि त्याने 15 सामन्यांत सर्वाधिक 741 धावा ठोकल्या आहेत. त्याची ही कामगिरी पाहून गावसकरांनी रोहित शर्मासह विराट कोहलीने डावाची सुरुवात करावी, असे सांगितले. यशस्वी जैसवालने तिसऱया क्रमांकावर खेळायला हवे. चौथ्या स्थानावर सूर्यकुमार यादवने आपला खेळ दाखवावा. पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंत आणि सहाव्या स्थानावर हार्दिक पंडय़ाने फलंदाजी करायला हवी. सातव्या क्रमांकावर रवींद्र जाडेजा, आठव्या क्रमांकावर शिवम दुबेने आपला झंझावाती खेळ करावा. मग कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराजचा नंबर लागेल, असे सांगत गावसकरांनी हिंदुस्थानची पूर्ण लाईनअप जाहीर केली. गावसकरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार हिंदुस्थानी फलंदाजी आठव्या क्रमांकापर्यंत खोलवर झाली आहे. आयर्लंडविरुद्ध हिंदुस्थानी संघ फलंदाजीचा हा प्रयोग करून पाहील, अशी आशा असल्यामुळे हिंदुस्थानचा अंतिम अकरा खेळाडूंचा संघही हाच असण्याची दाट शक्यता आहे.