>> तरंग वैद्य
एक मृत्यू आणि मारेकऱ्याचा शोध या घटनेवर आधारित ही छोटीशी कथा हलक्या-फुलक्या विनोदी पद्धतीने हाताळली आहे. कथेत एक वेगळेपण, ताजेपणा दर्शवणारी ‘सनफ्लॉवर’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे.
महानगरातील इमारतीत राहणाऱया एक व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू होतो आणि मग सुरू होतो तपास. इमारत म्हटली की, येणारे जाणारे खूप. दूधवाला, इस्त्राrवाला, कामवाली बाई… शिवाय शेजारी-पाजारी आणि जितके जास्त संशयित तेवढे पोलिसांचे कामही जास्त. एक मृत्यू आणि मारेकऱयाचा शोध. बघायला गेलं तर छोटीशी कथा आणि ही कथा जिथे घडते त्या इमारतीचे नाव ‘सनफ्लॉवर हाऊसिंग सोसायटी’ आणि म्हणून या वेब सीरिजचे नाव ‘सनफ्लॉवर’.
11 जून, 2021 ला झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘सनफ्लॉवर’चे आठ भाग आले. प्रत्येक भागाचा अवधी 38 ते 42 मिनिटांचा, पण खिळवून ठेवणारा. प्रसंगी हसवणाराही. कारण मृत्यूचा हा शोध काहीसा विनोदी पद्धतीने हाताळला आहे. याला ‘ब्लॅक कॉमेडी’ असंही म्हणतात.
कथासूत्र खूप छानरीत्या फुलवलं आहे. इमारतीत राहणारे लोक, कामवाल्या बायका, इमारतीचे कार्यकारी मंडळ… सगळ्यांच्या बारीकसारीक गोष्टींवर छान प्रकाश टाकला आहे. मुंबई किंवा महानगरातील लोक, जे फ्लॅट संस्कृतीत जगतात, ते पटकन कथेशी जोडले जातात. शेजारी किंवा इतर नेहमी येणारे-जाणारे पोलिसांच्या संशयाच्या सीमेत आहेत. ते कुठे येतात-जातात, त्यांचे ऑफिस हे सर्व दाखवत कथा फुलवली आहे आणि नेहमीच्या गंभीर पद्धतीने नसून हलक्या-फुलक्या विनोदी पद्धतीने. त्यामुळे कथेत एक वेगळेपण, ताजेपणा आहे.
कथेचा मुख्य पात्र सोनूची भूमिका सुनील ग्रोव्हर या लोकप्रिय हास्य कलाकाराने पेलली आहे. त्याची एक वेगळीच बोलायची शैली, विचित्र कपडे, विचित्र वागणं प्रेक्षकांना आवडलं आणि साधी कथा सुरस ठरली. अन्य कलाकारांमध्ये रणवीर शौरीने गंभीर पोलीस अधिकाऱयाची, तर गिरीश कुलकर्णीने काहीशा मिश्कील इन्स्पेक्टरची भूमिका छान निभावली आहे. त्याची आणि सोनूची जुगलबंदी धमाल उडवते. पोलिसांसोबत सामान्य माणूस एक अंतर राखून असतो. इथे मात्र सोनू पोलिसांशी ज्या मित्रत्वाने वागतो, ते बघून चांगलाच हशा पिकतो. आशीष विद्यार्थीने सोसायटीच्या कठोर प्रमुखाच्या भूमिकेला न्याय दिला आहे. आठव्या आणि शेवटच्या भागात पोलिसांना खात्री पटते की, सोनूच हत्येतला मुख्य आरोपी आहे आणि ते त्याला अटक करण्यासाठी निघतात. थोडक्यात चुकामूक होते. सोनूच्या डोक्यावर काळे कापड टाकून त्याला गायब केले जाते आणि आठवा भाग संपतो आणि आपल्याला वेध लागतात ‘सनफ्लॉवर 2’चे!
प्रेक्षकांना तब्बल तीन वर्षांची वाट बघायला लावून 1 मार्च, 2024 ला ‘सनफ्लॉवर सीझन 2’ झी 5 वर परत आठ भाग घेऊन दाखल झाला आहे. अर्थातच कथेत पोलिसांचा तपास पुढे सुरू. त्यांना आता खुन्याला शोधण्यासोबत गायब झालेल्या सोनूलाही हुडकून काढायचे आहे. कथा अधिक रंजक व्हावी म्हणून आता संशयाचा काटा इमारतीत राहणाऱया आहुजा दांपत्यावरही आलाय. सगळ्या घरांमध्ये लुडबुड करणाऱया कामवाली बाईवरही पोलिसांची नजर आहे. ज्याचा मृत्यू झाला आहे, त्याची मैत्रीण आता त्याच घरात राहायला आली आहे आणि घर तिच्या नावावर झाले असल्यामुळे प्रामुख्याने पोलीस तिच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करायला लागतात. दरम्यान, सोनू अनपेक्षितरीत्या परत येतो आणि काहीच झाले नाही अशा प्रकारे वागून सगळ्यांनाच संभ्रमित करतो.
‘द केरला स्टोरी’ने प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री अदा शर्मा ‘सनफ्लॉवर सीझन 2’मध्ये नवीन ‘एन्ट्री’ आहे. गेलेल्या व्यक्तीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत तिने केलेला बिनधास्त अभिनय प्रशंसनीय आहे. या भागात कामवाल्या बाईची भूमिका बऱयापैकी मोठी आणि लक्षात राहणारी आहे, अन्नपूर्णा सोनीने बडबडी, खटय़ाळ, काहीशी लंपट अशी विविधरंगी भूमिका छान निभावली आहे. आठव्या भागाच्या शेवटी अर्थातच आरोपी कोण ते कळतं. पण त्याचबरोबर त्याच इमारतीत आणखी एक संशयास्पद मृत्यू दाखवत ‘सीझन 3’ पण बघायला मिळेल असा संकेत देत ही मालिका इथेच संपते. त्यामुळे वेळ काढून बघा एकूण 16 भाग ‘सनफ्लॉवर’चे आहेत.
[email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)