
हवामान बदलाबरोबर आपल्या लाइफस्टाइलमध्येही बदल करणे गरजेचे असते. शरीराचे तापमान संतुलित राहावे आणि निरोगी राहावे यासाठी खाण्याच्या सवयींमध्येही बदल करणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आहारामध्ये कोशिंबीरींचा समावेश करणे गरजेचे आहे. दही किंवा ताकापासून बनवलेले पदार्थ हे उन्हाळ्यात खाणे खूप गरजेचे आहे. कोशिंबीरीमध्ये दही आणि ताक वापरले जाते जे प्रोबायोटिक असतात आणि उन्हाळ्यात पचनक्रिया निरोगी ठेवतात. उन्हाळ्यातही आपण वेगवेगळ्या कोशिंबीरी बनवून आहारात त्याचा समावेश करु शकतो.
डाळिंबाची कोशिंबीर
प्रथम दही चांगले फेटून घ्या, त्यानंतर त्यामध्ये एक चमचा साखर घालावी. त्यानंतर आता डाळिंबाचे दाणे घालून नीट मिक्स करुन घ्या. त्यात नंतर चवीनुसार मीठ, कोथिंबीर, भाजलेले जिरेपूड घालावी. ही कोशिंबीर थंड झाल्यावर सर्व्ह करा.
काकडीची कोशिंबीर
उन्हाळ्यात काकडीची कोशिंबीर हा सर्वात उत्तम पर्याय आहे. काकडी किसून घ्या, त्यानंतर त्यामध्ये दही नीट मिक्स करुन घ्यावे. भाजलेले जिरे पावडर, काळी मिरी, काळे मीठ, पांढरे मीठ घालावे. तुम्हाला हवे असल्यास याला फोडणीचा तडकाही देऊ शकता.
पुदिना कोशिंबीर
पुदिन्याची पाने देठापासून वेगळी करा आणि धुवा आणि नंतर त्यांना दह्यात नीट मिक्स करुन घ्या. एका भांड्यात काढून यामध्ये थोडी किसलेली काकडी घाला. चिरलेला कांदा घाला आणि काळे मीठ, काळी मिरी पावडर, जिरे पावडर घाला. पुदिन्याच्या पानांनी सजवा आणि सर्व्ह करा.
फळांची कोशिंबीर
द्राक्षे, डाळिंब, केळी, सफरचंद या फळांचे लहान तुकडे करा, नंतर त्यात दही मिक्स करावे. त्यात काळे मीठ, काळी मिरी पावडर आणि भाजलेले जिरे पावडर घालावे.