
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील धरणे 77 टक्के भरलेल्या अवस्थेत आहेत. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 23 टक्के अधिक जलसाठा आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता, उन्हाळ्यात टंचाईच्या झळा कमी बसण्याची शक्यता असून, जिल्हावासीयांच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे. मात्र, असे असले, तरी जिल्ह्यात धरणाच्या लाभक्षेत्रात वाढीव आवर्तनांची मागणी होत आहे.
सध्या जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा असला, तरी लाभक्षेत्र मात्र कोरडे आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात धरणांमधून सिंचनासाठी आवर्तन सोडल्यानंतरही पुन्हा पाण्याच्या आवर्तनाची मागणी वाढत आहे. सद्य:स्थितीत मोठ्या तीन व मध्यम सहा प्रमुख प्रकल्पांमध्ये 51 हजार 93 दशलक्ष घनफूट उपयुक्त जलसाठा आहे. अहिल्यानगरकरांना पाणीपुरवठा करणारे मुळा घरण 76.40 टक्के भरले आहे. भंडारदरा धरणात 95.77 टक्के जलसाठा आहे, तर निळवंडे धरणात 56.42 टक्के पाणी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या वर्षी धरणांमध्ये कमी साठा असल्याने जानेवारीच्या प्रारंभापासून टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली होती. बहुतांशी तालुक्यांमध्ये टँकर्सचा फेरा सुरू होता. यंदा धरणांमध्ये मुबलक साठा असल्याने उन्हाळ्यातही जिल्हावासीयांची पाण्याची चिंता दूर होणार आहे. 2024मध्ये जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता अधिक जाणवत होती. सर्वच तालुक्यांत गेल्या वर्षी टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. त्यात पाथर्डी, नगर, कर्जत, पारनेर, जामखेड या तालुक्यांत सर्वाधिक टैंकर्स सुरू होते. यंदा परिस्थिती चांगली असल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तरी प्रशासनाने टंचाईचा कृती आराखडा तयार केला असून, तो 44 कोटींचा आहे.
टँकरच्या मागणीचा प्रस्ताव
जिल्ह्यात धरणांमध्ये मोठा जलसाठा असला, तरी काही भागांत पावसाने ओढ दिल्याने त्या पठार भागात पाणीटंचाई भासू लागली आहे. संगमनेर तालुक्यात टैंकरसाठी प्रस्ताव दाखल झाला आहे.
धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफूटमध्ये)
भंडारदारा-20572, मुळा-19865, निळवंडे-4694, आढळा-861, मांडओहळ-237, पारगाव घाटशिळ-140, सीना-1810, खैरी-विसापूर-537-340.