600 रोल्स रॉयल्स, 450 फरारी; सोन्यानं मढवलेलं खाजगी जेट अन् 1788 खोल्यांचा महाल, ब्रुनेईच्या सुलतानची हेवा वाटणारी लक्झरी लाईफ

पैसा असला की ऐशोरामात जगण्यासाठी ज्या गोष्टी हव्या त्या सगळ्याच खरेदी करता येतात. पण जगातील 800 कोटी लोकंही ज्याचा विचार करू शकत नाहीत अशी लक्झरी लाईफ ब्रुनेईचे सुलतान हसन बोल्किया जगतात.

हसन बोल्किया यांच्याकडे हजारो लक्झरी कारचे कलेक्शन आहे. त्यांचा महाल 21 हजार वर्ग फुटांवर बांधण्यात आलेला असून त्यात जवळपास 1800 खोल्या आहेत. त्यांच्याकडे सोन्याने मढवलेले खासगी जेट आहे. एवढेच नाही तर त्यांची हजामत करण्यासाठी न्हावी थेट लंडनहून येतो. सध्या ते आपल्या याच लक्झरी लाईफमुळे चर्चेत आहेत.

लक्झरी कारचे कलेक्शन

सुलतान हसन बोल्किया हे जगातील सर्वात श्रीमंत राजे आहेत. त्यांची ओळख फक्त लक्झरी लाईफपुरती मर्यादित नाही, तर त्यांच्याकडे जगातील महागड्या आणि वेगवेगळ्या ब्रँडच्या 7000 गाड्यांचे खास कलेक्शन आहे. रोल्स रॉयल्स, बुगाटी, फरारी, लॅम्बोर्गिनी, मर्सिडीज बेंझ, पोर्शे, मॅकलॉरेन, बेंटले, एस्टन मॉर्टन सारख्या जगप्रसिद्ध ब्रँडच्या गाड्या त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे 600 रोल्स रॉयल्स, 450 फरारी आणि 380 बेंटले कार आहेत. यातील बहुतांश कार त्यांनी आपल्याला हव्या तशा बनवून घेतलेल्या आहेत. काही कारवर सोन्याचा मुलामाही देण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या कारची एकूण किंमतच 500 कोटी डॉलरच्या आसपास आहे, असे बोलले जाते.

जगातील सर्वात मोठा महाल

सुलतान हसन बोल्किया हे इस्ताना नुरूल इमान नावाच्या मोठ्या महालात राहतात. हे जगातील सर्वात मोठे निवासी ठिकाण असून हा महाल 21 हजार वर्ग फुटांवर पसरलेला आहे. या महालामध्ये 1788 खोल्या, 257 बाथरुम, 5 स्विमिंग पूल, 44 संगमरवरी जिने आणि लाईटचे 51 हजार बल्ब आहेत. तसेच 564 झुंबर आहेत. विशेष म्हणजे हा महाल 22 कॅरेट सोन्याने सजवण्यात आलेला आहे.

सोन्याने मढवलेले खासगी जेट

सुलतान हसन बोल्किया यांच्याकडे खासगी जेट आहे. त्यांच्याकडे बोईंग 747 विमान असून यात क्लिस्टल झुंबर, खासगी बेडरूम सूट, सोन्याचे वॉश बेसीन आणि सोन्याचा मुलामा दिलेले फर्निचर आहे. हा एक उडता महाल असल्याचेच बोलले जाते.

वाढदिवसाला 27 मिलियन खर्च

सुलतान हसन बोल्किया यांनी त्यांच्या 50व्या वाढदिवसाला मायकल जॅक्सनलाही बोलावले होते. यासाठी 17 मिलियन खर्च करण्यात आले होते. तसेच त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला 3000 पाहुणे आले होते. किंग चार्ल्सही यात सहभागी झाले होते. या एका दिवसाचा खर्च 27 मिलियन झाला होता असा अंदाज आहे.

हजामतीसाठी लंडनहून न्हावी

सुलतानाची लक्झरी लाईफ इथेच संपत नाही, तर त्यांची हजामत करण्यासाठी थेट लंडनहून न्हावी येतो. लंडन ते ब्रुनेइ खासगी जेटने तो न्हावी येतो आणि त्याला दाढी करण्यासाठी 20 हजार डॉलर दिले जातात.

तेलाने बनवले श्रीमंत

ब्रुनेईच्या सुलतानाकडे एवढा प्रचंड पैसा तेलामुळे येतो. ब्रुनेईमध्ये तेल आणि नैसर्गिक गॅसचे मोठे साठे आहेत. यामुळेत सुलतान हसन बोल्किया हे जगातील श्रीमंत शासकांपैकी एक आहेत.