![alanadi](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/alanadi-696x447.jpg)
>> सुजित कदम
सध्या धार्मिक, आध्यात्मिक स्थळांवर भक्तांची अलोट गर्दी दिसून येते. या गर्दीचे नियोजन करताना महत्त्वाचा मुद्दा ठरतो तो स्वच्छतेचा. अर्थात देवस्थान समिती याबाबत अनभिज्ञ नसते आणि सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी ती प्रयत्नशीलही असते. परंतु यात भक्तांचा वाटाही तितकाच महत्त्वाचा असतो. याचेच भान ठेवत अंधेरी येथील ‘आस गुरुदर्शनाची… जय शंकर भक्त परिवार, मुंबई’ या भक्त परिवाराने ‘देवाची आळंदी’ येथे स्वच्छता मोहीम घेण्याचे ठरविले आणि त्यांच्या परिवारातील अनेक सेवेकरी त्यात सहभागी झाले.
आज समाजात बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हे लक्षात घेऊन वेळोवेळी स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी ‘आस गुरुदर्शनाची… जय शंकर भक्त परिवार, मुंबई’ या परिवाराने ‘देवाची आळंदी’ येथे स्वच्छता मोहीम घेण्याचे ठरविले. त्यांच्या या कार्यात 29 सेवेकरी सहभागी झाले. मुंबईतील अंधेरीहून रात्रीचा प्रवास करीत भल्या पहाटे देवाची आळंदी तीर्थस्थानी पोहोचून या मंडळींनी कामाला सुरूवात केली.
आळंदीत येताच पहिले वंदन त्या गुरूमाऊलीला करीत सर्व सेवेकऱ्यांनी मंदिराला बाहेरूनच प्रदक्षिणा घातली आणि स्वच्छतेच्या कामाला सुरूवात केली. यासाठी योग्य पूर्वतयारी म्हणून सेवेकरी बंधुंनी हातमोजे, झाडू, बादल्या, खुरपे घेऊन इंद्रायणी घाट व मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली. ही सेवा करीत असताना दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी या सेवेचे कौतुक केले. काहींनी स्वतःहून हातभारही लावला. काही भक्तगणांनी आमच्या मुखात प्रसादरूपी लाडू दिला. तसेच आपापसांत चर्चा करीत होते की, आपण यांच्यासारखे स्वच्छता करू शकलो नाही, तर निदान आपण परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काहींना उपदेश करायला हवा. परिसर स्वच्छ पाहून त्यांनाही आमचा हेवा वाटला.
माऊलीचा आशीर्वाद
इंद्रायणी घाट संपूर्ण साफ करून धुऊन झाल्यानंतर आम्ही माऊलींच्या मंदिर परिसरात साफसफाई करायला घेतली. तिथे सातशे ते आठशे वर्षांपूर्वी माऊलींच्या स्पर्शाने प्रकट झालेला अजानबाग येथील अजानवृक्ष आहे. त्याच्या फांद्या आजतागायत कोणी तोडल्या नाहीत. संपूर्ण मंदिराच्या कळसापर्यंत त्याच्या फांद्या वाढल्या आहेत. त्या वृक्षाच्या पानाचे औषधोपयोगी फार महत्त्व आहे. नासा त्यावर संशोधनपूर्ण अभ्यास करीत आहे. त्या वृक्षाचे पान आपल्या अंगावर पडणे म्हणजे माऊलीचा आशीर्वाद मिळाला अशी ख्याती आहे. आम्हा सेवेकऱयांना तर हा आशीर्वादरूपी पानाचा प्रसाद गोळा करायचे भाग्य मिळाले.
या परिवाराने कित्येक तीर्थस्थानी स्वच्छता सेवा मोहीम राबवल्या आहेत. त्यात श्रीक्षेत्र गिरनार (गुजरात), श्रीक्षेत्र गाणगापूर संगम, निर्गुण पादुका मठ येथे स्वच्छता सेवा करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 20 आणि 21 जानेवारी 2025 रोजी प्रथमच महाराष्ट्रामध्ये या परिवाराकडून आतापर्यंतची सहावी स्वच्छता सेवा देवाची आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, पुणे येथे इंद्रायणी घाट व मंदिराचा परिसर स्वच्छ करून सेवा अर्पण करण्यात आली.
ही सेवा मिळवून देण्यासाठी परिवाराचे गुरुबंधू मार्गदर्शक विनायकराव क्षीरसागर, त्यांचे सहकारी व माजी सैनिक दत्तात्रय लोहकरे आणि श्री ज्ञानेश्वर देवस्थान समितीचे मोरे, माऊली बल्लाळ, श्रीकांतभाऊ, निंबाळकर यांचे योगदान लाभले. मुंबईतूनही बऱयाच भक्तगणांनी या सेवेला हातभार लावला. त्यामुळेच आम्हा सेवेकऱयांना ही सेवा करणे शक्य झाले. इंद्रायणी घाटावर दीपसेवासुद्धा करण्यात आली. जेणेकरून इंद्रायणी घाट स्वच्छ राहावा व लोकांना नदीचे पावित्र्य कळावे हा त्यामागचा शुद्ध हेतू. माऊलींनी म्हटलेच आहे की, ‘हे विश्वचि माझे घर!’ मग आपले घर आपणच स्वच्छ ठेवायला नको का?
दुसऱया दिवशी पहाटे चार वाजता समितीने सांगितल्याप्रमाणे काकड आरती घेण्याचा मान आम्हा सेवेकऱयांना मिळाला तसेच मंदिराच्या सभोवताली व मंदिरात दिवे लावून परिसर तेजोमय केला. हे दृश्य फार मनमोहक होते. दर्शनाला येणाऱया भाविकांनी कृपया आपल्या कळत-नकळतपणे जो कचरा होतो तो होऊ देऊ नये एवढी काळजी घ्यावी. त्यासाठी तेथे स्वच्छता जागृतीचे संदेशसुद्धा लावण्यात आले. येणाऱया भक्तांनी अशा पवित्र श्रद्धास्थानांची अवहेलना होऊ देऊ नये हाच विनंतीवजा संदेश यानिमित्ताने हा परिवार सर्वांना देत आहे. आळंदी स्वच्छता सेवेचा आनंद अजूनही त्यांच्या मनी तरंगतो आहे. म्हणूनच ते म्हणतात…
‘विश्रांतवड’ स्थळाला सेवा
12व्या व 13व्या शतकात श्री ज्ञानदेव व श्री चांगदेव यांची ज्या परिसरात भेट झाली ते ठिकाण. श्री ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला उपदेश केला त्या स्थळाला परंपरेने विश्रांतवड म्हणतात. या ऐतिहासिक स्थानाला पवित्र ठिकाण मानले जाते. आम्हा सेवेकऱयांना विश्रांतवड या ठिकाणीसुद्धा सेवा करण्याचे देवस्थान समितीने आग्रहाने सांगितले. त्यासाठी मंदिर समितीने आम्हाला एक गाडीही दिली. जेणेकरून आम्हाला एकत्र तिथे जाता येईल. या परिसरात सर्व सेवेकऱयांनी संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि सायंकाळी चहापान करून भजन, आरती म्हणून सांगता केली.