फुकट जेवणामुळे शिर्डीत महाराष्ट्रातील भिकारी गोळा झालेत! साई प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा; सुजय विखे यांचे वादग्रस्त विधान

शिर्डीतील साई प्रसादालयातील फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले आहेत. त्यामुळे येथील मोफत जेवण बंद करा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, ‘महाराष्ट्रातील भिकारी’ म्हटल्यामुळे साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शिर्डीतील साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकांना फुकट जेवण देते. यामुळे शिर्डीत भिकाऱयांची संख्या वाढली असून, मोफत जेवण बंद करून हा पैसा मुलांच्या भविष्यासाठी खर्च केला जावा, अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

साईबाबांनी आपल्या हयातीत आरोग्य सेवा आणि भुकेल्यांना मोफत जेवण दिले. गरज असेल तेथे शुल्क आकारणे ठीक आहे; पण सर्वसामान्यांना मोफत जेवण मिळतंय म्हणून आक्षेप घेण्याचं कारण काय, असा सवाल साईभक्तांनी केला आहे.
देणगीदार साईभक्तांनी 365 दिवस अन्नदानासाठी बुकिंग करून ठेवले असून, याचा आर्थिक बोजा साईबाबा संस्थानवर पडत नाही. साई संस्थानकडे साडेचारशे कोटींहून अधिक निधी अन्नदानासाठी पडून आहे. तो निधी साई संस्थानला अन्य कुठेही वापरता येत नाही. त्यामुळे अनावश्यक लोकांनी येथे येऊन जेवण करणे आणि गुन्हेगारी वाढणे यादृष्टीने बघू नये, असे साई संस्थानचे माजी विश्वस्त आणि काँग्रेसचे पदाधिकारी एकनाथ गोंदकर यांनी सांगितले.

भावना दुखावल्या हे मान्य – राधाकृष्ण विखे

सुजय विखे यांनी जो शब्द वापरला त्यामुळे भावना दुखावल्या असतील, हे मी मान्य करतो, असे जलसंधारणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. तर मध्यंतरी शिर्डीत भिक्षेकऱयांचा प्रश्न फार गंभीर झाला होता. भिक्षेकरी आणि साईभक्त यांच्यात वाद होऊन अनेकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे याबाबत नियमावली तयार व्हावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे ते म्हणाले.

  •  सामान्य दिवशी साई प्रसादालयात दिवसभरात 50 ते 60 हजार भक्त मोफत भोजनाचा लाभ घेतात. शनिवार, रविवार 70 ते 80 हजार भक्त जेवतात, तर उत्सव काळात ही संख्या 1 लाखाहून अधिक असते. एका दिवसाच्या अन्नदानासाठी पाच लाख रुपये, सुट्टीच्या दिवशी 10 लाख, तर उत्सव काळात 15 लाख देणगी आकारली जाते.