डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्जावर गंभीर हरकत, प्रचंड राजकीय दबावामुळे अर्ज फेटाळले

sujay-vikhe-patil

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या डॉ. सुजय विखे यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी 2 गंभीर मुद्द्यांवर हरकत घेत विखे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली. मात्र प्रचंड राजकीय दबावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे दोन्ही अर्ज रात्री उशिरा म्हणजे तब्बल 9 तासानंतर फेटाळले. या विरोधात शनिवारी (27) मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात दाद मागणार असल्याचे गिरीश जाधव यांनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (25) नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी 27 उमेदवारांनी 32 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केलेले 16 उमेदवार अशा प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या 43 एवढी झाली आहे. या दाखल अर्जाची छाननी शुक्रवारी (26) सकाळी 11 वाजल्यापासून सुरु झाली. या छाननी दरम्यान डॉ. सुजय विखे यांच्या अर्जावर गिरीश जाधव यांनी 2 मुद्द्यांवर हरकत घेतली. विखे यांनी पदाचा दुरुपयोग करत त्यांच्या विळद घाट येथील संस्थेकडे देय असलेली नगर महापालिकेची पाणीपट्टीची ३ कोटी रुपयांची रक्कम माफ करून घेतली. खासदार डॉ.सुजय विखे पाटील व आमदार, पालक मंत्री, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक रवींद्र बारस्कर आणि भाजपचे नगरसेवक महेंद्र गंधे यांच्यासमवेत हा 3 कोटींचा पाणीपट्टी चुकविण्याचा गुन्हेगारी कारस्थान रचलं, असा प्रस्ताव क्रमांक 4, दि. 11 जून 2021 रोजी सर्वसाधारण सभेत आणला. नगर महानगरपालिकेची कोविड काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आणि डॉ. विखे पाटील फाऊंडेशनच्या 4 संस्था महाविद्यालये आणि रुग्णालयांना 3 कोटी रुपयांचा पाणी कर माफ करण्याबाबतचा ठराव संमत केला

तसेच त्यांच्या खाजगी संस्थेसाठी वन विभागाची सुमारे 500 एकर जमीन बेकायदेशीर पणे संपादित करून घेतली. त्यासाठी राज्य सरकार, जिल्हाधिकारी नगर यांनी 1 रुपया नाममात्र भाडे विचारात घेता, निविदा प्रसिद्धीशिवाय, सार्वजनिक सूचना, कायद्याची योग्य प्रक्रिया न पाळता. या जमिनींच्या वाटपाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करण्यात आले आहे. कारण या जमिनींच्या आधारे कोट्यवधी रुपयांची मोठी कर्जे प्राप्त झाली असून या जमिनींच्या 7/12 उताऱ्याच्या इतर हक्काच्या रकान्यात कर्जाची रक्कम नमूद करण्यात आली आहे. शामराव विठ्ठल को-ऑप बँकेकडून डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनने घेतलेले कर्ज 51 कोटी 90 लाख 60 हजार आहे. त्यामुळे विखे यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी गिरीश जाधव यांनी केली. या हरकतीवर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय राखीव ठेवत रात्री उशिरा म्हणजे तब्बल 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर गिरीश जाधव यांच्या दोन्ही हरकती फेटाळल्या. याबाबत आपण निवडणुक निरीक्षक यांच्या कडे तक्रार केली असून या विरोधात शनिवारी (27) मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात दाद मागणार असल्याचे गिरीश जाधव यांनी सांगितले आहे.