
राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदा महिला अधिकाऱ्याला संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक यांनीदेखील राज्याचे मुख्य सचिक म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे या पदाकर काम करणारे पहिले दाम्पत्य म्हणूनदेखील त्यांची ओळख असणार आहे.
सुजाता सौनिक यांनी याआधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला असून आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक यांना एक वर्षाचा कार्यकाळ मिळणार असून जून 2025 मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.
राजेशकुमार, चहल होते स्पर्धेत
सेवाज्येष्ठतेनुसार 1987 च्या बॅचमधील गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (1988) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल (1989) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात होते, मात्र सुजाता सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.