मुंबईत सध्या जोरदारपणे हजारो बांधकामे सुरू असून या बांधकामामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे मध्यंतरी बांधकामांवर काही दिवस बंदी घालण्यात आली होती. मात्र आता पुन्हा ही बांधकामे सुरू झाली असून दिवसाला आठ हजार टन डेब्रिज तयार होत आहे, मात्र या डेब्रिजवर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे दहिसर आणि कल्याण येथे केवळ 1200 टनाचे दोन प्रकल्प आहेत, मात्र मुंबईत डेब्रिजची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी येत्या काळात या प्रकल्पांची क्षमता वाढवण्याचे काम मुंबई महापालिका करणार आहे.
मुंबई प्रेस क्लबमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या ‘कन्स्ट्रशन अॅण्ड डिमोलेशन सेक्टर अॅण्ड एअर पोल्यूशन’ या विषयावरील मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालिका उपायुक्त किरण दिघावकर, फ्प्फुसरोग तज्ञ लान्सलॉट पिंटो, इंदूरमध्ये झीरो कचरा व्यवस्थापनासाठी काम करणारे राकेश कुमार, शाश्वत शहरांसाठी काम करणारे प्रयास गिरिया आदी मान्यवर उपस्थित होते.
डेब्रिजचा पुनर्वापर वाढला पाहिजे
ओला कचरा, सुका कचऱ्याबरोबरच बांधकामातून निर्माण होणारे डेब्रिजही टाकले जात आहे. त्यामुळे अशा कचऱयाचा पुनर्वापर करणे शक्य होत नाही. डेब्रिज गोळा करण्यासाठी ‘डेब्रिज ऑन काॅल’ ही संकल्पना राबवली जात असून सध्या यासाठी आकारले जाणारे शुल्क टप्प्याटप्प्याने कमी केले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य, कंत्राटदार याचा वापर करतील आणि अनधिकृतपणे टाकल्या जाणाऱ्या डेब्रिजला आळा बसेल, अशी माहिती पालिका उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
हिंदुस्थानींची फुप्फुसे कमकुवत
मुंबईसह देशात वायू प्रदूषणाचे प्रमाण जागतिक मानांकनाच्या दृष्टीने जास्त असून त्यामुळे होणाऱया मृत्यूची संख्याही मोठी आहे. प्रदूषणाचा फटका गर्भाला आणि लहान मुलांनाही बसत असून त्यांच्या वजन आणि उंचीवरही त्याचा परिणाम होत आहे. वायू प्रदूषणामुळे हिंदुस्थानींची फुप्फुसे कमकुवत झाली असून त्यामुळे दमा, मधुमेह, ब्लडप्रेशर, ऑटो इम्युन डिसिज ते फुप्फुसाच्या कर्परोगाचा धोका वाढला आहे, अशी माहिती फुप्फुसरोगतज्ञ लान्सलॉट पिंटो यांनी दिली.