केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी काही निर्णय घेतले त्यात गंगा प्रदूषणाबाबत देखील एक निर्णय घेतला होता. नमामी गंगे या त्यांच्या प्रोजेक्टला तब्बल दहा वर्षे होऊनही अद्याप गंगेतलं प्रदूषण कमी झालेले नसल्याचे सांगत भाजपच्याच नेत्याने त्यांच्या या प्रकल्पाचे वाभाडे काढले. चंद्रपुरात वातावरण बदलावर सुरू झालेल्या परिषदेत बोलताना माजी मंत्री व भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ‘गंगेत डुबकी मारल्यावर त्वचारोग होतं हे ऐकूनच अंगावर काटा येतो’, असं अजब विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. ‘महाकुंभ’ 144 वर्षांनी प्रयागराजमध्ये होत आहे. तिथे डुबकी मारल्यावर त्वचारोग होतं हे ऐकूनच अंगावर काटा येतो. राम तेरी गंगा मैली हे ऐकावं लागतंय बघावं लागतंय. अमृताचा एक थेंब तिथे पडला म्हणून तिथे कुंभ होतोय, पण त्या अमृताच्या थेंबाला देखील आपण विष बनवून टाकलं. याचा आपण विचार करायला हवा, असे मुनगंटीवार म्हणाले.