भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरवासीयांच्या प्रश्नांवरून आज स्वत:च्या सरकारला आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या ऊर्जा विभागाला लक्ष्य केले आहे. चंद्रपूरच्या जनतेने वीज निर्मितीसाठी सहकार्य करायचे आणि सरकारने आम्हाला माती खायला लावायची, असे चालणार नाही, असा खरमरीत इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे काय? महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाचेही मानणार नाही? ऊर्जा विभाग सर्वोच्च न्यायालयाचं ऐकणार नाही? असे सवाल देखील त्यांनी यावेळी केले.
चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर गावातून वीज केंद्राला ‘रोप वे’ च्या माध्यमातून कोळसा पुरवला जातो. हा ‘रोप वे’ चाळीस वर्षे जुना आहे. त्यामुळे कोळशाची धूळ आणि आवाज याचा त्रास येथील लोकांना सहन करावा लागत आहे. स्थानिकांनी यासंदर्भात मुनगंटीवार यांना वारंवार तक्रारी केल्यानंतर आज त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. दुर्गापूरमधील रोप वे आणि ध्वनी प्रदूषणाची स्थिती अनुभवली. त्यांनी लगेच वीज केंद्राच्या वरिष्ठांशी बोलून समस्या मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. मात्र हे करताना त्यांनी आपल्या सरकारला आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे असलेल्या ऊर्जा विभागाला इशारा दिला. ‘आम्ही 112 वाघांचे सहाशे वाघ करू शकतो, तर वाघाचा पंजा पण मारू शकतो’, अशा शब्दात त्यांनी सरकारला ठणकावलं.
सर्वोच्च न्यायालयानं आवाजाची विशिष्ट मर्यादा आखून दिली आहे. यासाठी गणेशोत्सवात आम्ही डीजे वर बंदी घालतो. मग डीजे वाजत नाही तर सीएसपी वाजेल का? मग त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे काय? महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाचेही मानणार नाही? ऊर्जा विभाग सर्वोच्च न्यायालयाचं ऐकणार नाही? हे तर संविधान लागू होण्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे त्यामुळे सर्वांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागेल.
– सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते, आमदार
या प्रश्नासंदर्भात बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, ‘या यंत्रणा आता टाकाऊ झाल्या आहेत. सीटीपीएसचे जे सीजीएम आहे त्यांना आता मी विचारणा केली की किती वर्ष झाली या यंत्रणेला तर चाळीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तर आताचा कालावधी हा नवीन यंत्रणा वापरण्याचा कालावधी आहे’. नवीन यंत्रणा बसवून सीएचपी प्लांट आमचे अधिकारी चांगले करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.