
माझी तर खुर्ची गेली, पण पंतप्रधान ज्या खुर्चीवर बसतात ती खुर्ची येत्या सहा महिन्यांत बनवून देणार, असे सांगत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याची सल बोलून दाखवली.
मंत्रीपद न मिळाल्याचे दुःख मुनगंटीवार काही केल्या विसरायला तयार नाहीत. चंद्रपूर येथे भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्लाइंग क्लबच्या उद्घाटनाच्या निमित्ताने झालेल्या जाहीर कार्यक्रमात मुनगंटीवार यांनी मंत्रीपद न मिळाल्याची सल बोलून दाखवली. मुनगंटीवार म्हणाले, मी नुकताच अयोध्येच्या श्रीराम मंदिरात जाऊन आलो. या मंदिराचे सर्व दरवाजे हे माझ्या मतदारसंघातील लाकडाने तयार केले आहेत.
नव्या संसद भवनाचे दरवाजेही लाकडी
नव्या संसद भवनाचे दरवाजेही येथील लाकडाने तयार झाले आहेत. त्या संसदेच्या दाराने मी आत जाऊ शकलो नाही. माझी तर खुर्चीही गेली आहे, पण सहा महिन्यांत पंतप्रधान ज्या खुर्चीवर बसतात ती खुर्ची माझ्या मतदारसंघातून बनवून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.