सुदानमध्ये सैनिक करतायत महिलांना ब्लॅकमेल, अन्नपदार्थांसाठी करावी लागतेय शैय्यासोबत

सुदान गेल्या अनेक दिवसांपासून गृहयुद्धाच्या आगीत जळत आहे. सुदानमध्ये 15 एप्रिलपासून सशस्त्र सेना आणि त्यांचे प्रतिस्पर्धी निमलष्करी दल रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात सामान्य जनता मोठ्या प्रमाणात होरपळली जातेय. एकीकडे युद्धामुळे देशातली परिस्थिती अत्यंत खराब असताना दुसरीकडे महिलांना त्यांच्या कुटुंबीयांचे पोट भरण्यासाठी नको ते करावे लागत आहे. तेथील सैनिक हे अन्नपदार्थांच्या बदल्यात महिलांना त्यांच्यासोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडत आहेत.

सुदानमधील ओमरडर्मन शहरातून काही महिला या देश सोडून पळून गेल्या आहेत. त्यातील काही महिलांनी गार्डीयनला दिलेल्या मुलाखतीत काही धक्कादायक दावे केले आहे. सुदानमध्ये सध्या कामधंदे ठप्प आहे. त्यामुळे तेथील जनतेचे खाण्यापिण्याचे खूप हाल होत आहेत.युद्धामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहे त्यामुळे त्या भागातील घरं ओस पडली आहे. मोठमोठे स्टोअर ओस पडले आहेत. तेथील अन्नपदार्थ घेण्यासाठी जाणाऱ्या महिलांना सैनिकांच्या नको त्या मागण्या पूर्ण कराव्या लागत आहेत.

अनेक सैनिक हे खाद्यपदार्थांच्या बदल्यात महिलांकडे शरीरसुखाची मागणी करत आहे. सैनिकांसोबत शैय्यासोबत केल्यानंतरच त्या महिलांना दुकानातूनु किंवा ओस पडलेल्या घरातून काही वस्तू घेऊन जाण्याची परवानगी दिली जाते. अनेकदा महिला नकार देतात तेव्हा महिलांना मारहाण केली जाते. एका 21 वर्षीय मुलीने सेक्सला नकार दिल्यानंतर तिचे पाय जाळले होते असे एका महिलेने गार्डियनला सांगितले.