असे सच्चे सज्जन राजकारणात दुर्मिळ, आदित्य ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं असून दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण देशात शोक व्यक्त केला जात आहे. यातच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘एक्स’वर एक पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले की, ”माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने खूप दुःख झालं. आपल्या कार्यकाळात इतकं यश मिळवूनही एखादे पंतप्रधान खरोखर इतके नम्र आणि दयाळू कसे असू शकतात, याची छाप त्यांच्या भेटीदरम्यान माझ्यावर पडली.” ते म्हणाले, 90च्या दशकात जन्म झालेल्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी त्यांनी हिंदुस्थानचे दरवाजे जगासाठी खुले केले आणि हिंदुस्थान साठी जगाचे दरवाजेही खुले केले. जणू संपूर्ण जग आपल्याजवळ आणले. यासाठी त्यांचे आभार मानावे लागतील.”

आदित्य ठाकरे म्हणाले, ”कदाचित ते हिंदुस्थानातील अशा व्यक्तींपैकी एक आहे, ज्यांचा आपल्या जीवनावर आणि संपूर्ण देशावर मोठा प्रभाव पडला आहे. त्यांनी आपल्या देशाला खऱ्या अर्थाने जागतिक पटलावर आणले.”

ते पुढे म्हणाले की, ”आम्ही हिंदुस्थानी खरोखर मानतो की वर्तमानकाळ देखील त्यांच्या सारख्या कौशल्यपूर्ण आणि द्रष्ट्या राजकीय नेत्याच्या कार्यकाळाचे उदारतेनेच मूल्यमापन करेल.”