Success Story : रस्त्यावर विकायला सुरू केलं लोणचं आणि मुरांबा, उभा केला पाच कोटी रुपयांचा व्यवसाय

एका गृहिणीने रस्त्यावरच लोणचं आणि मुरांबा विकायला सुरुवात केली. लोकांना त्यांच्या हातची चव आवडली. लोकांनी हे लोणचं आणि मुरांबा हातोहात विकत घ्यायला सुरुवात केली. आज या व्यवसायाची उलाढाल पाच कोटीं रुपयांच्या घरात पोहोचली आहे. असे असले तरी कृष्णा यादव यांचा हा प्रवास सोपा नव्हता.

मूळच्या उत्तर प्रदेशच्या कृष्णा यादव या कधीच शाळेत गेल्या नाहीत. त्यांचे लग्न बुलंदशहरमध्ये झाले. त्यांचे पती ट्रॅफिक पोलिस होते. पण काही कारणास्तव त्यांची नोकरी गेली. कृष्णा यादव यांच्या पतीने गाड्या विकण्याचा व्यवसाय सुरु केला. पण त्यांना व्यवसायात मोठं नुकसान झालं. यादव कुटुंबीयांना आपलं घर विकावं लागलं. यादव कुटुबांची परिस्थिती एवढी बिकट होती की त्यांना भाजी विकत घ्यायलाही पैसे नसायचे. कृष्णा यादव, त्यांचे पती आणि तीन मुलं हे चपाती आणि मीठ खायचे आणि दिवस ढकलायचे. त्यानंतर कृष्णा यादव दिल्लीत आपल्या वडिलांकडे रहायला गेल्या. तिथे त्यांनी नोकरी शोधायला सुरूवात केली. पण शिक्षण नसल्याने यादव यांना नोकरीही मिळत नव्हती.

दिल्लीत त्यांनी एका शेतकऱ्याकडून जागा भाड्याने घेतली. त्यात दिलेल्या जागेत भाजी पिकवायची. भाजी विकल्यावर काही रक्कम मालकाकडे जमा करावी लागायची. पण बाजारात भाजीला किंमत नव्हती. त्यामुळे या व्यवसायातही कृष्णा यादव कसेबसे दिवस ढकलत होत्या.

त्यानंतर कृष्णा यादव यांनी कृषी विज्ञान केंद्रात लोणची आणि मुरंबा बनवायचे प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून यादव यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. या केंद्रात यांना लोणची, मुरांबा, ज्यूस आणि इतर पदार्थ बनवायचे प्रशिक्षण घेतले. पण फक्त या प्रशिक्षणावरून यादव यांचे भागले नाही. यादव यांच्या घरी लहाणपणी त्यांच्या आई आणि आजी लोणची आणि मुरांबा बनवायच्या. लोणच्यात आणि मुरांब्यात साखर, तेल, मसाले यांचे किती प्रमाण असले पाहिजे हे त्यांनी आई आणि आजीकडून शिकल्या होत्या. आता हे ज्ञान त्यांना कामी येणार होतं.

मोठ्या मेहनतीने कृष्णा यादव यांनी लोणची आणि मुरांबा बनवले. पण ते काही एका दिवसात विकले जाणार नव्हते. रस्त्यावर टेबल टाकून आपले पदार्थ विकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांना फार यश आले नाही. म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली. रस्त्यावर एक टेबल टाकून त्यावर पाण्याचा माठ आणि स्टीलचा ग्लास ठेवला. येणारे जाणारे पाणी प्यायचे, तेव्हा कृष्णा यादव या लोकांना आपल्या मुरांबा आणि लोणच्याचे मोफत सॅम्पल द्यायच्या. त्यामुळे अनेक घरात कृष्णा यादव यांच्या लोणचे आणि मुरांब्याचा ब्रॅण्ड श्रीकृष्ण पिकल पोहोचला. लोकांना यादव यांच्या हातची चव वाढली. लोकांनी त्यांच्या स्टॉलकडे गर्दी केली. बघता बघता यादव यांची उत्पादनं हातोहात विकली गेली. आज कृष्णा यादव 250 प्रकारचे लोणची, मुरांबा, चटणी, सिरप आणि ज्युस विकतात. आज त्यांचा हा व्यवसाय 5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे.