अर्थसंकल्प PMO मध्ये लिहिला, फक्त सहीसाठी FM कडे पाठवला! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘एनडीए’ सरकार ज्या नितीश कुमार यांच्या जदयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाच्या कुबड्यांवर उभे आहे त्या बिहार व आंध्र प्रदेशवर या अर्थसंकल्पातून पैशाचा पाऊस पाडण्यात आला. सरकार टिकवण्यासाठीची ही धडपड असल्याची टीका यानंतर विरोधकांनी केली. आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही अर्थसंकल्पावरून मोदी सरकार आणि अर्थमंत्र्यांवर टीका करत घरचा आहेर दिला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट केली आहे. याद्वारे त्यांनी निर्मला सीतारामन यांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यंदाचा अर्थसंकल्प पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) बनवला गेला, मात्र तिथल्या मूर्खांनी तो सहीसाठी ‘निमी’ (निर्मला सीतारामन) यांच्याकडे पाठवला, असे स्वामी यांनी म्हटले. स्वामी यांनी निर्मला सीतारामन यांचा उल्लेख ‘निमी’ असा केला आहे.

महाराष्ट्रमुक्त बजेट! लाडका बिहार, लाडका आंध्र; सरकारला टेकू देणाऱ्यांना अर्थ वाटपाचा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थनितींवर कडाडून हल्ला करणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी निर्मला सीतारामन या जेएनयूच्या एलुमनाई असल्यावरूनही निशाणा साधला. स्वामी पोस्टच्या शेवटी म्हटले की, निर्मला सीतारामन या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनी आहेत. याचा अर्थ त्यांना फक्त नाच आणि गाणे एवढेच माहिती आहे, असा टोला स्वामी यांनी लगावला.

कर रचनेत बदल

0 ते 3 लाख उत्पन्न – 0 टक्के कर
3 ते 7 लाख उत्पन्न – 5 टक्के कर
7 ते 10 लाख उत्पन्न – 10 टक्के कर
10 ते 12 लाख उत्पन्न – 15 टक्के कर
12 ते 15 लाख उत्पन्न – 20 टक्के कर
15 लाखांवर उत्पन्न – 30 टक्के कर

काय स्वस्त होणार?

मोबाईल फोन आणि चार्जर, सोने, चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने, कर्करोगावरील उपचारासांठी लागणारी औषधे, सोलार पॅनेल, फोन आणि लिथियन बॅटरी, एक्स-रे मशीन, चामडय़ापासून बनवलेल्या वस्तू, माशांपासून बनवलेली उत्पादने.

काय महाग?

स्फोटके बनवण्यासाठी वापरले जाणारे अमोनियम नायट्रेट, राजकीय आणि व्यावसायिक जाहिरातींसाठी वापरले जाणारे फ्लेक्स किंवा बॅनर.