>> सुभाषचंद्र सुराणा
जैन श्वेतांबर धर्मीयांचे पर्युषण पर्व यंदा 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2024 पर्यंत संपूर्ण देश-विदेशात भक्तिभावाने साजरे केले जाणार आहे. पर्युषण पर्व म्हणजे आत्मशुद्धी करण्याचा मार्ग. आपल्या जीवनातील पापकर्मांचे निर्जरा करण्यासाठी व मोक्षप्राप्ती होण्यासाठीचे हे व्रत आहे.
हिंदुस्थानात अनेक धार्मिक पंथ आपापल्या रूढी-रिवाजाने, पारंपरिक पद्धतीने, धर्म आचरणाने आपापले सण साजरे करीत असतात. त्याचप्रमाणे आपल्या देशातील जैन श्वेतांबर धर्मीयांचे पर्युषण पर्व यंदा 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2024 पर्यंत संपूर्ण देश-विदेशात भक्तिभावाने साजरे केले जाणार आहे.
जैन धर्मीयांच्या श्वेतांबर मंदिरमार्गी, स्थानकवासी, तेरापंथी समाजामध्ये हे आठ दिवसांचे पर्युषण पर्व असते. तसेच दिगंबर जैन बांधव हा सण दहा दिवस साजरा करीत असल्याने तो दशलक्षणीय पर्युषण पर्व म्हणून साजरा केला जातो. दिगंबर बांधव ते पर्युषण पर्व गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत पारंपरिक रीतिरिवाजाने साजरे करीत असतात.
पर्युषण पर्वाचा अखेरचा सर्वात मोठा म्हणजे विशेष महत्त्वपूर्ण दिवस ‘जैन संवत्सरी’ पर्व म्हणून ओळखला जातो. सालाबादप्रमाणे हा अखेरचा दिवस गणेश चतुर्थीच्या दिवशी साजरा होत असतो. यंदाही हा दिवस 7-8 सप्टेंबर रविवारला भाद्रपद शुद्ध 5 रोजी संपन्न होत आहे. पर्युषण पर्वाचा म्हणजेच अखेरचा महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे जैन संवत्सरी. या दिवशी सर्व जैन बांधव आपल्या धार्मिक स्थळांमध्ये संवत्सरी प्रपामण करून 84 लक्ष प्राणिमात्रांची क्षमायाचना करून, आत्मशुद्धीने प्रार्थना करून गेल्या वर्षापासून आजतागायत कळत-नकळत झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून सर्व प्राणिमात्रांची, सर्व समाजबांधवांची, तसेच सर्वधर्मीय मनुष्यांची व प्राण्यांची अंत:करणपूर्वक क्षमा याचना करीत ‘मिच्छमि, दु:खडम’ म्हणत क्षमा याचना करून खामत खामना करीत संवत्सरी पर्व साजरे करतात. सर्वांशी माझे बंधुभाव, प्रेम, सर्व जिवांशी माझी मैत्री अखंड आहे. कोणाशीही राग, लोभ, शत्रुत्व नाही अशी मनोभावे प्रार्थना करतात.
जैन धर्माच्या इतिहासानुसार त्यांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभनाथ (आदिनाथ भगवान) ते 24 वे तीर्थंकर म. महावीर या सर्व तीर्थंकरांनी जैन धर्माची मूलभूत तत्त्वे ‘आगम’ या धर्मग्रंथानुसार दृढ व मजबूत केली. या धर्म संहितेनुसार या पर्युषण पर्वाच्या कालावधीत देशभरातील सर्व जैनीयांची मंदिरे, उपाश्रय जैनस्थानक या धर्म केंद्रांतून वास्तव्यात असलेले जैन मुनी गुरुमहाराज, आचार्य, मुनी, स्वामीजी, मा.सा. इत्यादीद्वारे ’अगम’ ग्रंथातील धर्मतत्त्वे, कल्पसूत्राचे वाचन या पर्वामध्ये जैनश्रावक श्राविकाच्यासाठी गुरू उपदेश, गुरू संदेश जीनवाणीनुसार आत्मचिंतनद्वारे मार्गदर्शक व प्रेरणादायी होत असल्याने लाखो श्राविक भक्तीने तल्लीन होऊन जातात.
म. महावीर यांनी सर्व मानवजातींच्या आत्मशांती व आत्मकल्याणासाठी समता आणि शांतता संदेश सर्व जगाला दिला. त्यांनी अनेकांतवाद, सत्य, अहिंसा आणि अपरीग्रह या तत्त्वांचा प्रसार केला. त्यांचीही शिकवण जैन धर्मग्रंथ 45 चे ‘आगम’ धर्मग्रंथ याद्वारे जैन धर्माची शिक्षा व दीक्षा इत्यादीबाबतचे पूर्ण विश्लेषण त्यांचे शिष्य गौतम स्वामी, भद्रबाहू, सुधर्मबाहू त्यांच्याकडे उपदेशात्मक विवेचन केले आहे. हीच जैन धर्माची शिक्षा व दीक्षा आचरण म्हणून आजपर्यंत पाळली जात आहे.
पर्युषण पर्व म्हणजे आत्मशुद्धी करण्याचा एकमेव साधन प्रशिक्षण प्रकल्प होय. आपल्या जीवनातील अनेक पापकर्मांचे निर्जरा करण्यासाठी तो तन-मन-धनाचा त्याग करून या दिवसातील ािढयाकर्माच्या साधनाद्वारे आपली जीवनयात्रा मोक्षप्राप्तीसाठीची शिडी चढण्यासाठी मार्गी होतो.
पर्युषण पर्वाची आराधना करण्यासाठी म. महावीरांनी समता, क्षमा आणि संयम या तीन सूत्रांद्वारे आत्मकल्याण करण्याचा मार्ग दाखविला आहे.
पर्युषण पर्वाचा संदेश आहे की, भूतकाळातील, वर्तमानकाळातील जीवनात ज्या काही अप्रिय घटना, राग-द्वेष, शत्रुत्व, भांडणे, तंटे व त्यांची तसेच स्वत:च्या आत्मबांधव, मित्रपरिवार, व्यावसायिक वर्ग इत्यादी कार्यक्षेत्रांतील सर्वांची मनोभावनेने क्षमायाचना करून म्हणजेच ‘क्षमा वीरश्य भूषणम’ या तत्त्वाचा स्वीकार करावा. क्षमा करा, क्षमा मागा. प्रेमपूर्वक, अंत:करणपूर्वक क्षमा मागून बंधुत्व व मैत्रीत्व मार्ग स्वीकारा. ‘अकडकर मत रहो, झुक जावो, झुकने मे बडा लाभ है’ या तीन सूत्रांचा जीवनात वापर करा. ’आगम’ ग्रंथातील जीवनाचा खरोखर मार्मिक अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे जीवन जगण्याचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत.
म. महावीर यांसारख्या 24 तीर्थंकर भगवंतांनी स्वत:च्या आत्मशुद्धीने, तपोबलाने तसेच समता, क्षमा व संयमी जीवनाने आत्मबलाच्या जोरावर मोक्षमार्ग मिळवून सुखी जीवनाचा मार्ग दाखविला आहे.
आत्मकल्याण, अहिंसा व चरित्र जीवनशैलीचा जैन धर्माचा प्राण आहे, तर पर्युषण पर्व हा जैन धर्माचा आत्मा आहे. आत्मशुद्धीद्वारे मोक्ष प्राप्ती होते ही पर्युषण पर्वाची शिकवण आहे. आत्मकल्याणाचा मार्ग हे पर्युषण पर्वाचे मौलिक महत्त्व आहे.