पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती पेन्शन मिळाली असती? सुभाष देसाईंनी दिला सगळा हिशोब

दोन कुबड्या घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी घरी बसले असते तर त्यांना देखील बेसिक पेन्शन 45 हजार व महागाई भत्ता 45 हजार अशी 90 हजार रुपयांची पेन्शन मिळाली असती, असा सगळा हिशोब शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते माजी मंत्री सुभाष देसाई यांनी दिला. तसेच नोव्हेंबर नंतर तीन चाकी असलेले सरकार निवृत्त होईल असे भाकीतही सुभाष देसाई यांनी वर्तवले.

कोपरगाव येथे जुनी पेन्शन महाअधिवेशनात सुभाष देसाई म्हणाले की, दोन कुबड्या घेण्याऐवजी पंतप्रधान घरी बसले असते तर त्यांना देखील बेसिक पेन्शन 45 हजार व महागाई भत्ता 45 हजार अशी 90 हजार रुपयांची पेन्शन सुरू झाली असती. नोव्हेंबर नंतर तीन चाकी असलेले सरकार निवृत्त होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 70 हजार, देवा भाऊ यांना 80 हजार, तर दादांना 90 हजार पेन्शन मिळणार.

आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान यांना पेन्शनचा हक्क असेल, तर 58 वर्ष कर्मचाऱ्यांनी सेवा केल्यानंतर पेन्शन मागितली तर त्यात काय चूक, असा सवाल सुभाष देसाई यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, माणूस म्हणून वयाच्या उत्तरार्धात पेन्शन हा एक दिलासा आहे. पेन्शनच्या पैशात छान आयुष्य जगता येणार नाही. परंतु कोणासमोर कटोरा घेऊन उभे राहण्याची वेळ सुद्धा येणार नाही. निवृत्तीनंतरचा हा विचार पेन्शनच्या संकल्पनेत पूर्वीपासून झालेला आहे. त्यासाठी निवृत्ती वेतन या कल्पनेचा जन्म झाला आहे. याच्यापेक्षा दुसरी न्याय मागणी असू शकत नाही. कोणत्याही विभागाचा कर्मचारी असो, तो सेवा बजावत असतो सातत्याने 58 वर्ष सेवेत घातल्यानंतर निवृत्ती नंतर पोराकडे हात पसरून लाचारीने उभे रहावं लागू नये, असे सुभाष देसाई म्हणाले.

जुन्या पेन्शनच्या शिलेदारांना ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ हे तुमचे घोषवाक्य ऐकल्यानंतर, आम्हाला सर्वांना जुनं ते सोनं हे कळतं. हे काही नवं मागत नाही. आपण आम्हाला जे देत होता ते द्या. आम्ही आकाशातील चंद्र तारे तोडून मागत नाही. जे मिळतं होतं, जे बंद झालं तेच आम्हाला पुन्हा सुरू करून द्या. निदान दोन घास स्वाभिमानाने खाता येईल एवढी पेन्शन द्या, यापेक्षा वेगळी मागणी काय आहे. त्यासाठी निवृत्ती वेतन या कल्पनेचा जन्म झाला आहे. याच्यापेक्षा दुसरी न्याय मागणी असू शकत नाही. गेली 22 वर्ष मी आमदार आहे. पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंनी मला आमदार केले. त्यानंतर पुन्हा पुन्हा उद्धव ठाकरे यांनी मला आमदार केले, मला 84 हजार पेन्शन मिळते. आपली मागणी, विनंती आपण सर्वजण ज्यांना आधार मानतो ते उद्धव साहेब निश्चितपणाने पूर्ण करतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असेही ते शेवटी म्हणाले.