ठाणे शहराचे शिल्पकार, ठाण्याच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवार दि. 5 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4.30 वाजता सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी सतीश प्रधान यांना वाहिलेली शब्दांजली…
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील ‘ठाण्याचे शिल्पकार’ अशी सतीश प्रधान यांची ओळख करून दिल्यास ती चुकीची ठरणार नाही. तो शिवसेनेच्या उदयाचा काळ होता. आधी साप्ताहिक ‘मार्मिक’मधून आणि नंतर शिवसेना स्थापन करून बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली होती.
शिवसेना ही संघटना दिवसागणिक झपाट्याने वाढत होती. पुढच्या दोन दशकांतच राज्यभरात पसरलेल्या वटवृक्षाचं मूळ मुंबईत होतं, मात्र या वटवृक्षाची सर्वात मोठी शाखा ठाण्यात वाढली. ठाण्यातील असंख्य तरुण शिवसेनेकडे आकर्षित झाले. सतीश प्रधान त्यातलेच एक. नेतृत्वाचे गुण त्यांच्यात उपजतच होते. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार ठाण्यातल्या शिवसेनेला वाढवण्यात, तिथली संघटना बांधणी करण्यात सतीश प्रधानांनी स्वतःला वाहून घेतलं आणि अल्पावधीतच ठाण्यातील सुशिक्षित-सुसंस्कृत मराठीजनांमध्ये शिवसेना खोलवर रुजली.
शिवसेनेची स्थापना 1966मध्ये झाली आणि पुढच्याच वर्षी 1967 साली ठाणे नगरपालिकेवर भगवा फडकला. शिवसेनेचे वसंतराव मराठे ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. 1974 साली नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत सतीश प्रधान प्रचंड मताधिक्याने निवडून आले. 1982 साली ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाली. 1986 साली ठाणेकरांनी शिवसेनेलाच ठाणे महापालिकेवर निवडून दिले आणि सतीश प्रधान हे ठाण्याचे प्रथम महापौर झाले. ठाणे हे खऱ्या अर्थाने ‘शिवसेनेचे ठाणे’ झाले.
आज ठाण्याला आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखतो. ती ओळख ठाण्यातील शिवसेनेच्या विस्ताराबरोबर अधिकाधिक घट्ट होत गेली. सतीश प्रधान हे ठाण्यातील शिवसेनेचा चेहरा होते आणि ठाण्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा सर्वच क्षेत्रांत त्यांनी अक्षरशः डोंगराएवढं काम केलं. ठाण्याचा सांस्कृतिक चेहरामोहरा बदलणारं गडकरी रंगायतन (1978) आणि असंख्य तरुण-तरुणींना क्रीडाविश्वाची ओळख करून देणारं दादोजी कोंडदेव स्टेडियम (1981) उभारलं गेलं. कारण सतीश प्रधानांचं सर्वसंचारी नेतृत्व. ठाण्यातून नाटककार-अभिनेत्यांची आणि विविध खेळाडूंची पिढी निर्माण झाली ती प्रधानांनी केलेल्या या पायाभरणीतूनच. एक क्रीडा प्रकार असा नव्हता की, ज्याच्या ठाण्यातील संघटनेचं अध्यक्ष पद सतीश प्रधानांकडे नव्हतं. त्यांच्याच पुढाकाराने ठाण्यात वर्षा मॅरेथान सुरू झाली. शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी भव्य चित्रकला स्पर्धा भरवण्याची सुरुवातही त्यांनीच केली. हे दोन्ही उपक्रम त्यांनी तब्बल दोन दशकं राबवले. 1980मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या ‘ज्ञानसाधना’ या शैक्षणिक संस्थेतून ठाणेकरांच्या अनेक पिढय़ांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.
सतीश प्रधानांचे नेतृत्वगुण शिवसेनाप्रमुखांनी हेरले होते आणि म्हणूनच 1992 आणि 1998 असे दोन वेळा शिवसेनाप्रमुखांनी त्यांना राज्यसभा खासदार म्हणून दिल्लीला पाठवले. शिवसेनेचे खासदार म्हणून या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या संसदीय समित्यांवर काम केले.
मात्र ठाण्यातील विकासाची वाटचाल साधी, सुलभ कधीच नव्हती. शिवसेना पक्षाप्रमाणेच सतीश प्रधानांनाही वेळोवेळी अग्निदिव्यातून पुढे जावे लागले. दुसरा-तिसरा हतबल झाला असता इतके अडथळे प्रत्येक योजनेच्या मार्गात उभे राहिले. दुर्दैव असे की, असे अडथळे काही ठाणेकरांनीच उभे केले होते. पण हार मानतील ते सतीश प्रधान कसले! बाळासाहेबांच्या दृढनिश्चयी नेतृत्वाचे अखंड पाठबळ होतेच.
निवडणूक प्रचारसभेत भाषण करतानाच बाळासाहेबांना गर्दीतून एक चिठ्ठी आली. ‘तुमची सत्ता आल्यावर आम्हा ठाणेकरांना नाटय़गृह मिळेल का?’ असा प्रश्न त्या चिठ्ठीत होता. चिठ्ठी मोठ्याने वाचून शिवसेनाप्रमुखांनी आपल्या खणखणीत आवाजात ठाणेकरांना शब्द दिला, ‘ठाणेकरांसाठी माझी शिवसेना नाटय़गृह देईल!’ त्यांनी सतीश प्रधानांना बजावलेच, ‘सतीश, मी शब्द दिला आहे. हे काम झालेच पाहिजे.’ प्रधान झपाटून कामाला लागले आणि एक माशी शिंकली. त्यावेळी ठाणे शहर भाजपचे अध्यक्ष. पा.वा. घारपुरे नावाचे गृहस्थ होते. त्यांनी नाटय़गृह होऊ नये असा चंगच बांधला. कोर्टातून मनाई हुकूमच घेऊन आले. या अन्यायकारक हुकूमाविरुद्ध प्रधान लढले आणि जिंकले! नाटय़गृहाचे काम वेगाने पूर्ण करून घेतले. शिवसेनाप्रमुखांनी नाव सुचवले – ‘गडकरी रंगायतन’.
हे रंगायतन अल्पावधीत लोकप्रिय झाले. इतके की, या नाटय़गृहात पु.ल. देशपांडे पहिल्यांदा आले तेव्हा ते निहायत खूश झाले. नाटय़गृहाचा रंगमंच, ध्वनिप्रकाश व्यवस्था पाहून महाराष्ट्राचे हे लाडके व्यक्तिमत्त्व उत्स्फूर्तपणे उद्गारले, ‘महाराष्ट्रात असे नाटय़गृह नाही!’ सतीश प्रधानांना यापेक्षा वेगळी पोचपावती ती कोणती मिळाली असती!
ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणावरून वेळकाढू प्रकरणे उकरून काढण्यासाठी पुन्हा काही जण शड्डू ठोकून उभे राहिले. त्या जागेवर खारटण रोडची झोपडपट्टी उभी होती. महापालिकेचे सफाई कामगार तिथे राहत. त्यामुळे महापालिकेची दुहेरी जबाबदारी आली. सर्वांचे पुनर्वसन करायचे, त्यांना पर्यायी घरकुले देण्याचा निर्णयही झाला होता, पण विरोधकांची पोटदुखी थांबेना. त्यांनी थेट राज्य शासनाकडे क्रीडा संकुल योजनेलाच स्थगिती देण्याची मागणी केली. सतीश प्रधान डगमगले नाहीत. त्यांनी कामगारांशी थेट बोलणी केली. संघटनेशी चर्चा केली. प्रकरणाचा गोड शेवट होऊन काम मार्गी लागले. शिवसेनाप्रमुखांनी संकुलाला ‘दादोजी कोंडदेव क्रीडांगण’ असे नाव देऊन वाजतगाजत उद्घाटन केले. या स्टेडियमची योजना हाणून पाडण्याच्या कटाचे सूत्रधार कोण होते ठाऊक आहे? पुन्हा भाजपचे पा.वा. घारपुरे!
नाईकवाडी परिसरात दादा पाटील रस्त्यावरची वाहतूककोंडी ठाणेकरांना असहय़ होऊ लागली तेव्हा पुन्हा प्रधानांनी कोतवालांचा बंगला आणि तेथील अडथळा ठरलेली पाच दुकाने नुकसानभरपाई व पर्यायी जागा देऊन हटविली आणि वाहतुकीला सुरळीतपणा आणला.
विचित्र प्रकार म्हणजे, सेंट जॉन शाळेच्या परिसरात बेकायदेशीरपणे रिकाम्या लॉऱ्या उभ्या करून त्यात समाजकंटक चक्क वेश्याव्यवसाय चालवत होते. जांभळी नाक्यासारख्या हमरस्त्यावरची ही अंदाधुंदी सतीश प्रधानांनी पोलीस आणि शिवसैनिकांच्या मदतीने कायमची हद्दपार केली.
या सर्व काळात प्रधानांना शिवसेनाप्रमुखांचे मार्गदर्शन व खंबीर पाठिंबा होताच. जिवाभावाच्या सहकाऱयांनी ठाणे नगरीची बांधिलकी जपली आणि सतीशजींच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे पदाधिकारी प्रत्येक वेळी पाय रोवून उभे राहिले. सतीश प्रधानांना सावलीसारखी सोबत करणारे नगरसेवक भास्कर पाटील यांना एका खास कामगिरीबद्दल ठाणेकरांनी शाबासकी दिली. 1986 साली झालेल्या पहिल्यावहिल्या महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्र. 65मधून भास्कर पाटील यांना सतीश प्रधानांनी आग्रहाने उभे केले. या वॉर्डातून विरोधात निवडणूक लढवीत असलेले भाजपचे घारपुरे (तेच ते) यांना पराभूत करायचे या निश्चयाने भास्कर पाटील यांनी प्रधानांची आणि तमाम ठाणेकरांची ती इच्छा नुसती पूर्ण केली नाही, तर घारपुरेंची अनामतही जप्त केली. धन्य ते ठाणेकर आणि धन्य ते सतीश प्रधान!
विनम्र आदरांजली!!