अकरावीच्या दुसऱया फेरीतील प्रवेश नाकारणे महागात पडेल;  प्रवेश न घेणाऱया विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीत संधी नाही

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱया गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीचे कॉलेज नाकारणे, घेतलेला प्रवेश रद्द करणे विद्यार्थ्यांना महागात पडू शकते. प्रवेश रद्द करणाऱया विद्यार्थ्यांना पुढील एका प्रवेश फेरीसाठी बाद ठरविले जाणार आहे. त्यामुळे दुसऱया यादीतील प्रवेश नाकारणाऱया विद्यार्थ्यांना तिसऱया यादीत प्रवेशाची संधी मिळणार नाही. या विद्यार्थ्यांना विशेष प्रवेश फेरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या तीन नियमित प्रवेश फेऱया होणार आहेत. त्यामुळे तिसरी यादी शेवटची फेरी असून यानंतर विशेष फेरीद्वारे प्रवेश पार पडणार आहेत. मुंबईतील अनेक नामांकित महाविद्यालयांतील जागा पहिल्या तीन प्रवेश फेरीतच भरल्या जातात. त्यामुळे दुसऱया यादीत मिळालेला प्रवेश नाकारताना विद्यार्थ्यांना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे.

– दुसऱया प्रवेश फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास किंवा प्रवेश नाकारल्यास पुढील एका फेरीसाठी म्हणजेच तिसऱया प्रवेश फेरीसाठी विद्यार्थी बाद ठरविला जाणार आहे.

– तसेच दुसऱया यादीत मिळालेला प्रवेश रद्द केल्यास अशा विद्यार्थ्यांना तिसऱया यादीत प्रवेशाची संधी मिळणार नाही.
– अशा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विशेष फेरीचीच वाट पहावी लागणार आहे.

दुसऱया प्रवेश फेरीचे वेळापत्रक
– प्रवेश अर्ज सादर करणे 3 ते 6 जुलै, रात्री 10 वाजेपर्यंत
– गुणवत्ता यादी तयार करणे 7 ते 9 जुलै
– गुणवत्ता यादी जाहीर करणे 10 जुलै, सकाळी 10 वाजता
– प्रवेश निश्चित करणे 10 ते 12 जुलै, सायंकाळी 6 पर्यंत
– पुढील फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे 12 जुलै, रात्री 8 वाजता