
विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रामधील चुका, स्पोर्ट्स कॅम्पसची दुरवस्था, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राची रखडपट्टी, विद्यार्थ्यांच्या शुल्कातून घेतलेल्या गाड्या भंगारात जाणे आणि कलिना कॅम्पसला झोपडपट्ट्यांचा विळखा अशा अनेक प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांची अक्षरशः वाताहत होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आज सिनेटदरम्यान युवा सेनेच्या सर्व सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या गेटवर जोरदार घोषणा देत आंदोलन केले.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड गोंधळ सुरू आहे. याबाबत प्रशासनासोबत वारंवार संपर्क साधून कार्यवाही करण्याची मागणी केली असूनही कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. शिवाय ‘आयटा’ला दिलेली जागा परत घेणे, तरण तलाव परिपूर्ण करणे अशा अनेक मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत. मात्र याकडे विद्यापीठ प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे युवा सेना सिनेट सदस्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. यावेळी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, शीतल शेठ-देवरुखकर, मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचाडे, परम यादव, अल्पेश भोईर, स्नेहा गवळी, मयूर पांचाळ आणि किसन सावंत आदी उपस्थित होते.
अर्थसंकल्प मंजुरी प्रक्रियेत व्यवस्थापन समितीच्या हक्कांची पायमल्ली
विद्यापीठ कायद्यानुसार व्यवस्थापन सदस्यांना अर्थसंकल्प मसुदा किमान सात दिवस आधी देणे बंधनकारक आहे. ज्यामुळे सदस्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत मत मांडता येते. शिवाय चर्चा करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात येते. मात्र विद्यापीठ प्रशासनाने थेट सिनेटच्या आदल्या दिवशी हा मसुदा दिला. ही प्रक्रिया व्यवस्थापन समिती सदस्यांच्या हक्कांवर घाला घालणारी आहे. प्रशासनाच्या या अन्यायकारक भूमिकेविरोधात आज सर्व सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेराव घालून जाब विचारला.