पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिलेट न्यूट्रिशियन बार (पौष्टिक चिक्की) मध्ये बुरशी व अळ्या आढळून आल्याने शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. चिंचणी व खानिवली येथील शाळांमध्ये हा प्रकार आता समोर आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून हा निकृष्ट दर्जाच्या आहाराचा विद्यार्थ्यांना पुरवठा होत होता. त्यामुळे सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून पालकांची चिंता वाढली आहे. आमच्या मुला-मुलींच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवा, असा टाहो पालकांनी फोडला आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या 2 हजार 371 प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुलांना मिलेट न्यूट्रिशियन बार दिला जातो. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 30 पौष्टिक आहार दिला जातो. 19 दिवसांचे खाद्यपदार्थांचे वितरण केले जात आहे. या पौष्टिक खाद्यात जिवंत अळ्या आणि बुरशी आढळत असल्याच्या तक्रारी ऑगस्ट महिन्यापासून अनेक शाळा करत आहेत. त्यानंतरही त्याचे वाटप सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्याच्या पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत मिलेट न्यूट्रिशियन बार फूडचा पुरवठा केला जातो. पुरवठ्याचे कंत्राट इंडो अलाइड प्रोटीन फूड्स प्रा.लि. मुंबई यांच्याकडे आहे.
शिक्षण विभागाचा कानाडोळा
पालघर जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 2 लाख 75 हजार 291 विद्यार्थ्यांना हे पौष्टिक खाद्य वाटप केले जात आहे. मात्र अळ्या व बुरशीयुक्त खाद्य देऊन मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. शिक्षण विभागानेही हे खाद्य देण्यापूर्वी त्याची प्राथमिक तपासणी करणे गरजेचे असताना त्याकडे कानाडोळा झाला. त्यामुळे निकृष्ट दर्जाचा पोषण आहार खाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. खानिवली येथील आनंद लक्ष्मण चंदावरकर विद्यालय, चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेतील आहारात अळ्या आणि बुरशी आढळून आले. याप्रकरणी तक्रार करण्यात आली. मात्र शिक्षण विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही.
शिक्षण संचालकांवर कारवाई करा
विद्यार्थ्यांसाठी मिलेट न्यूट्रिशियन बारचा पुरवठा करताना संबंधित ठेकेदाराने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र हा ठेकेदार एकदम निकृष्ट दर्जाचा पोषण आहार करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी तक्रारी आल्यानंतर संबंधित ठेकेदारावर कारवाई होणे आवश्यक होते. मात्र शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी या ठेकेदाराची पाठराखण केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रजनीकांत पाटील या पालकांनी केली आहे.