निफाडमधील विद्यार्थ्यांनी बनवली अनोखी ‘सोलर कॅप’, विक्रेत्यांना उन्हात आणि अंधारात होणार फायदा

नाशिक जिह्यातील निफाड येथील वैतनेय विद्यालयाच्या इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी स्नेहा नागरे आणि गौरी साळुंखे यांनी ठेले विक्रेत्यांसाठी सौर ऊर्जेवर चालणारी टोपी तयार केली आहे. विद्यालयाच्या अटल टिंकरिंग लॅबमध्ये त्यांनी ही अनोखी टोपी बनवली. टोपीला ‘सोलर कॅप’ असे नाव देण्यात आले असून उन्हात आणि रात्रीच्या अंधारात वस्तूंची विक्री करत असलेल्या ठेले विक्रेत्यांना याचा फायदा होणार आहे. विद्यार्थिनींनी शिरीष पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सोलर कॅप तयार केली.

सोलर पॅनेल, लिथियम आयन बॅटरी, एक मिनी फॅन, एलईडी लाइट्स आणि आवाज सहाय्यक यंत्रणेचा टोपीमध्ये समावेश आहे. सोलर कॅपमुळे उन्हापासून संरक्षण आणि अंधारात काम करताना आवश्यक प्रकाश मिळतो. या प्रकल्पासाठी 2,140 रुपयांचा खर्च आला. अटल टिंकरिंग लॅब ही योजना केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत राबवली जाते. आताच्या घडीला हिंदुस्थानात 10,000 हून अधिक अटल टिंकरिंग लॅब कार्यरत आहेत. या लॅब्समुळे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आवश्यक असलेली साधने, आवश्यक ज्ञान, माहिती आणि प्रोत्साहन मिळते.