बिहार लोकसेवा आयोगाची 70 वी पूर्व परीक्षा पूर्ण रद्द करावी यासाठी पाटणा येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. रविवारी पाटण्यातील रस्त्यांवर प्रचंड गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज केला. या निदर्शनाप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण 21 नामांकित आणि 600 अनोळखी लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. याशिवाय जनसुरज पक्षाचे प्रशांत किशोर यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून गोंधळ घातल्याप्रकरणी तसेत कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन झाल्यामुळे प्रशांत किशोर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पाटणा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिली आहे. मनोज भारती (अध्यक्ष जनसुरज पक्ष), रहमानशु मिश्रा, कोचिंग डायरेक्टर निखिल मणी तिवारी, सुभाष कुमार ठाकूर, शुभम स्नेहिल, आणि प्रशांत किशोर यांच्यासोबत असलेले 2 बाऊन्सर यांचा समावेश आहे. आनंद मिश्रा, राकेश कुमार मिश्रा, विष्णू कुमार, सुजित कुमार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परीक्षा रद्द करण्याची मागणी
13 डिसेंबर 2024 रोजी बिहारमधील 912 केंद्रांवर बीपीएससीची परीक्षा झाली. पाटण्यातील बापू परीक्षा केंद्रावर पेपरफुटीच्या कारणावरून गोंधळ झाला होता. त्यानंतर आयोगाने या केंद्राची परीक्षा रद्द केली. 4 जानेवारी रोजी या केंद्रावर पुन्हा परीक्षा घेण्याची अधिसूचना जारी करण्यात आली. मात्र, संपूर्ण राज्यातील परीक्षा पुन्हा व्हावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले. जनसुराजच्या प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे.
रविवारी गांधी मैदानावर मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले होते. मात्र आंदोलनासाठी प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती. सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा वळवला. यावेळी जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना रोखले. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नसताना देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी जमल्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. अनेक आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.