व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा दिलेले विद्यार्थी आता प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार या प्रतीक्षेत आहेत. बारावीनंतरच्या सर्वसाधारण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जुलै महिना उजाडला तरी अद्याप सुरू झालेली नाही. विद्यार्थी हित लक्षात घेता युवासेनेने याप्रकरणी उच्च व तंत्रशिक्षण विभाग प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडे ही प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्याकडे काही विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभाग प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्याकडे ई-मेलद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील तब्बल 11 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा दिली आहे. परीक्षांचे निकाल लागून एक महिना उलटला तरी सीईटी सेलने प्रवेश सुरू केलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. प्रवेश प्रक्रियेला उशीर होत असल्याने अनेक विद्यार्थी खासगी विद्यापीठांकडे जाण्याचा विचार करीत आहेत. लवकरात लवकर ही परीक्षा सुरू करण्याच्या मागणीसाठी युवासेना सहसचिव अॅड. संतोष धोत्रे, सहसचिव परशुराम तपासे यांनी सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू करणार
शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी कृषी शिक्षणांतर्गत विविध अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची आली आहे. त्याचबरोबर विविध अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन लवकरात लवकर सुरू करण्यात येतील, असे सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.