MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर झालाच, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) मुख्य परीक्षेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता ही परीक्षा 26, 27 आणि 28 मे रोजी होणार आहे. याबाबत एमपीएससीकडून X वर एक पोस्ट करत माहिती देण्यात आली आहे.

याबाबत माहिती देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक शुध्दीपत्रक जारी केलं आहे. या शुध्दीपत्रकात सांगण्यात आलं आहे की, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या सुधारित निकालानुसार नव्याने पात्र ठरलेल्या या 318 उमेदवारांना राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला नसल्यामुळे दिनांक 26 ते 28 एप्रिल, 2025 या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उमेदवारांकडून आयोगास निवेदने प्राप्त झाली आहेत. उमेदवारांकडून प्राप्त निवेदने तसेच इतर सर्व बाबींचा साकल्याने विचार करून प्रस्तुत राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ सुधारित वेळापत्रकानुसार दिनांक 26, 27 व 29 मे 2025 या कालावधीत घेण्यात येईल. आरक्षणाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीचा विचार करून परीक्षेच्या वेळापत्रकातील प्रस्तुत बदल हा एकवेळची अपवादात्मक बाब म्हणून आयोगाकडून सदर निर्णय घेण्यात आला आहे, असं यात सांगण्यात आलं आहे.