मोबाईलवरून चुकीचा मेसेज व्हायरल केला म्हणून म्हारळमधील सेव्रेड हार्ट स्कूलमध्ये 11वीत शिकणाऱया एका विद्यार्थ्याला संस्थाचालकांनी बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर लाल शेराही मारला. आता दुसऱया कोणत्याही कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश मिळणार नाही या तणावातून विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण तालुक्यातील निंबवली गावात घडली. अनिश दळवी (17) असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. सेव्रेड हार्ट स्कूलच्या संचालकांनी त्याच्या मित्रांसह त्याला आपल्या केबिनमध्ये बुधवारी बोलवले व जाब विचारला. एवढेच नव्हे तर चामडय़ाच्या पट्टय़ाने या विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली, असा आरोप अनिशचे चुलत आजोबा भिवा दळवी यांनी केला आहे. दरम्यान विद्यार्थ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱया संस्थाचालकाला अटक करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱयांनी दिले असून या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे.