कुष्ठरोग झालेला नसतानाही कुष्ठरोगाची औषधे दिल्यामुळे चौथीमध्ये शिक्षण घेणाऱ्या खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला आहे. हा प्रकार पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत घडला आहे. खुशबूच्या चेहऱ्यावर जन्मापासूनच तीन चट्टे होते. याच चट्ट्यांचे गांभीर्याने परीक्षण न करता आश्रमशाळेत असलेल्या कुसूम अभियानातील वैद्यकीय पथकाने तिला कुष्ठरोग झाल्याचे जाहीर करून उपचारही सुरू केले. या औषधांचा साईड इफेक्ट झाल्यामुळे खुशबू आजारी पडली. तिची प्रकृती खालवली आणि पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेमध्ये कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाकरूळ उपकेंद्राने 16 डिसेंबर 2024 रोजी शिबीर घेतले होते. कुसूम अभियानांतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात केली होती. त्या वेळी इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेल्या खुशबूला वैद्यकीय पथकाने कुष्ठरोग झाल्याचे जाहीर केले. खुशबूच्या अंगावर असलेल्या तीन चट्टयांमुळे हा निष्कर्ष काढण्यात आला. तिला कुष्ठरोग झाल्याची कोणतीही कल्पना तिच्या पालकांना देण्यात आली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 18 डिसेंबरपासून तिला कुष्ठरोगाची औषधे देणे सुरू करण्यात आले. आश्रमशाळेच्या अधिक्षिका सुवर्णा वरगने या खुशबूला दररोज दोन गोळ्या देत होत्या. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला.
माझी मुलगी चुकीच्या उपचाराने गेली; दोषींवर कडक कारवाई करा
माझ्या मुलीला कोणताही आजार झालेला नव्हता. तिच्या चेहऱ्यावर असलेले डाग हे जन्मापासूनच होते. चुकीचे निदान करून मुलीला कुष्ठरोगी ठरविण्यात आले आहे. खुशबूच्या लिव्हरला आणि अंगावर आलेली सूज ही चुकीच्या उपचारामुळे आली होती. माझ्या मुलीच्या मृत्यूस आश्रमशाळा मुख्याध्यापक, अधिक्षिका आणि वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर जबाबदार आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांनी केली आहे.
अंगावर फोडी येऊन हात-पाय सुजले
खुशबू आजारी पडल्यामुळे तिचे वडील नामदेव ठाकरे तिला आपल्या गावी तांबडी येथे घेऊन आले. वरगने यांनी सांगितल्यानुसार ते खुशबूला दररोज दोन गोळ्या देत होते. त्यांनी 3 जानेवारी रोजी खुशबूला पुन्हा आश्रमशाळेत सोडले. कुष्ठरोग झालेला नसतानाही घेत असलेल्या या औषधांचा साईड इफेक्ट झाल्याने खुशबूची प्रकृती आणखी खालवली. तिच्या अंगावर मोठमोठ्या फोडी आल्या आणि हात-पाय सुजले. तिला तातडीने पेण येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिची प्रकृती आणखी खालवल्यामुळे तिला तातडीने कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे तिला कुष्ठरोग झाले नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डॉक्टरांनी ही औषधे तातडीने बंद केली. मात्र या औषधांचा मोठा साईड इफेक्ट झाल्याने तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.