
प्रशासकीय स्तरावर लॉटरी बंदीसाठी दबाव आणण्यात येत असून त्याला राज्यातील हजारो लॉटरी विक्रेते आणि त्यांचे कुटुंबीय यांनी आक्रमकपणे विरोध करणे काळाची गरज आहे. लॉटरी बंद झाल्यास बेरोजगारी, बेकारी, गुन्हेगारी याचे संकट अधिक गडद होईल. त्यामुळे सरकारने लॉटरी बंदीचा निर्णय घेतल्यास सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी केले आहे.
नव्या सरकारने लॉटरी बंदचा निर्णय घेतला तर राज्यभरातील विक्रेते आणि त्यांच्यावर अवलंबून उद्योगधंदे व कुटुंबीय यांच्यासमोर उदरनिर्वाहाचे संकट अटळ आहे. त्यासाठी राज्यातील हजारो लॉटरी विक्रेते आणि त्यांच्या लाखो कुटुंबीयांनी एकजुटीने संघटनेबरोबर उभे राहावे, असेही सातार्डेकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या बंदीच्या विरोधात सर्वानी राज्याचे अर्थ सचिव, लॉटरी आयुक्त, मुख्यमंत्री यांच्याशी पत्राद्वारे, ई-मेलद्वारे संपर्क साधून आपला निषेध नोंदवावा. विक्रेते, ग्राहक, वितरक, विक्रेत्यांचे कुटुंबीय या साऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संघटनेने केले आहे.