
>> प्रभा कुडके
नामदेव ढसाळ यांच्यावरील ‘चल, हल्ला बोल या चित्रपटाला परवानगी नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचा निषेध म्हणून नुकताच गोरेगावच्या केशव गोरे स्मारक ट्रस्ट सभागृहात एक कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाला झालेल्या तुडूंब गर्दीवरूनच नामदेव ढसाळ यांच्या कार्याची प्रचिती येते. नामदेव ढसाळांच्या कवितांचे वाचनही यावेळी करण्यात आले होते. कार्यक्रमाला कविता वाचनासाठी नीरजा, प्रज्ञा दया पवार, संभाजी भगत, अभिनेत्री चिन्मयी सुमित, दीपक राजाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमावेळी नामदेव ढसाळ यांची मुलाखत आणि भाषणही दाखवण्यात आले. मुख्य म्हणजे नामदेव ढसाळांच्या आठवणी सांगतानाच सेन्सॉर बोर्डाला ‘तुही यत्ता कंची’ असा परखड सवालही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. याप्रसंगी सभागृहाबाहेर चित्रपटाला परवानगी नाकारणाऱ्या त्या सेन्सॉर बोर्डच्या निर्णयाची होळी केली गेली हे देखील दाखवण्यात आले.
‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट दलित पँथर चळवळीवर आधारित असून, हा चित्रपट प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ यांचा जीवनपट आहे. या चित्रपटातील नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला असून, चित्रपटा मध्ये शिवराळ भाषेचा उल्लेख आहे असे म्हटले आहे. आम्ही तत्कालीन सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यांना नामदेव ढसाळ यांचा परिचय सांगून, पद्मश्री विजेता आहेत हेही सांगितलं. तरीही सेन्सॉर बोर्ड आम्हाला सहकार्य करत नाही. 2024 ऑगस्ट पासून आम्ही चित्रपटासाठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी धडपड करत आहोत. त्यामुळेच आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
चल हल्ला बोल- चित्रपट निर्माते महेश बनसोडे
बंडखोर कवी व दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्यावर जीवनावर आधारीत चित्रपट ‘चल हल्ला बोल’ सध्या सेन्साॅर बोर्डाच्या कात्रीत सापडला आहे. ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट दलित पँथर तसेच युवा क्रांती दल यांच्यातील चळवळीवर बेतलेला चित्रपट आहे. परंतु सेन्साॅर बोर्डाने यातील शिवराळ भाषेवर आणि नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आक्षेप घेतला. कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचे सेन्साॅर बोर्डाने मत व्यक्त केले. नामदेव ढसाळांबद्दल माहीती देताच, कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न सेन्साॅर बोर्डाकडून विचारण्यात आला. “कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही”. या सेन्साॅर बोर्डातील अधिकाऱ्याच्या वक्तव्यामुळे सध्याच्या घडीला दलित चळवळीतील कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील जनतेकडूनही संताप व्यक्त होत आहे.