शिवसेनेत जोरदार इनकमिंग; भाजपचे माजी आमदार रमेश कुथे, हटकर समाजाचे नेते रमेश मस्के शिवबंधनात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी आज शिवसेनेत जोरदार इनकमिंग झाले. भाजप नेते व गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे, हिंगोलीतील हटकर समाजाचे नेते डॉ. रमेश मस्के (नाईक), जालना बदनापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले.

‘मातोश्री’ निवासस्थानी हे पक्षप्रवेश पार पडले. रमेश कुथे हे शिवसेनेचे दोन वेळा आमदार होते. 2018 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र सुरुवातीपासूनच भाजपने आपल्याला बेवकूफ बनवले, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपकडे उमेदवारी मागूनही मिळाली नव्हती आणि या वेळीही विधानसभेत आपल्याला डावलले जाणार होते, सातत्याने होणारी ही उपेक्षा असह्य झाली होती, असे कुथे म्हणाले.

हिंगोलीतील हटकर समाजाचे नेते डॉ. रमेश मस्के (नाईक) यांनीही असंख्य समाजबांधवांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज भगवा खांद्यावर घेतला. याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, नांदेड हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात आदी उपस्थित होते.

बदनापुरातील भाजप, आरएसएस पदाधिकारी शिवसेनेत

माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे पदाधिकारी, भाजप नेते डॉ. सुरेशकुमार कासर, मुस्लिम समाजाचे अभ्यासक प्रा. डॉ. शफी शेख, सरपंच राजेंद्र जैस्वाल, अॅड. विष्णू मदन, भाजप पदाधिकारी रामेश्वर फंड, आसीफ पटेल, अजित पवार गटाचे पदाधिकारी साजीद पटेल यांनीही हाती शिवबंधन बांधले. याप्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे आदी उपस्थित होते.