घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाने डॉक्टर आणि कर्मचाऱयांना मारहाण करीत रुग्णालयाच्या साहित्याची नासधूस केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे डॉक्टर, कर्मचाऱयांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याने म्युनिसिपल मजदूर युनियनकडून आज मारहाणीचा निषेध करण्यासाठी ‘काम बंद आंदोलन’ केल्यामुळे काही काळ आरोग्य सेवेवर परिणाम झाला.
राजावाडी रुग्णालयात गेल्या आठवड्यात प्रकाश सोनावणे यांना नातेवाईकांनी उपचारासाठी दाखल केले. या रुग्णास ताप, लुजमोशन, डिसओरिएनटेशनचा त्रास होत होता. रात्री 11 वा. च्या सुमारास पेशंट प्रकाश सोनवणे यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्या नातेवाईकांना आय.सी.यू. वॉर्डमध्ये बोलविण्यात आले. त्या वेळी आय.सी.यू. वॉर्डच्या डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल असे सांगितले. या वेळी पेशंट प्रकाश सोनवणे यांच्या नातेवाईकांनी आयसीयूमधील शॉक द्यायची मशीन तोडली आणि कर्मचाऱयांना मारहाण केली. दरम्यान, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱयांना आवश्यक सुरक्षा देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने प्रकाश वाणी यांनी केली आहे.
एफआयआर दाखल
या घटनेत सफाई कामगार नीतेश सादरे यांना मारहाण केली. त्यामुळे डॉक्टर व तेथील कर्मचाऱयांनी सदर घटनेबाबत पोलीस ठाण्यात एफआयआर नं. 0576 अन्वये तक्रार दाखल केली आहे. म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, सहा. सरचिटणीस शैलेंद्र खानविलकर व सहचिटणीस सूर्यकांत गुढेकर यांना कळताच त्यांनी राजावाडी रुग्णालयात धाव घेऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला, तर मारहाणीच्या निषेधार्थ युनियनकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी युनियनचे कार्यकर्ते हरिष सोडा, आनंद जगताप आदी उपस्थित होते.