
हुक्का पार्लरवर नियंत्रण आणण्यासाठीचा कायदा अधिक कठोर केला जाणार असून वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. याशिवाय दुसऱ्यांदा हुक्का आढळून आल्यास सहा महिन्यांसाठी परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. तिसऱ्यांदा हुक्का आढळून आल्यास संबंधित हॉटेल, उपाहारगृहाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
आमदार सुनील कांबळे यांनी पुण्यात हुक्क्याची राजरोस विक्री सुरू असल्याबाबत आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी केलेला कायदा अधिक कडक करण्यात येणार आहे. एखाद्या उपाहारगृहात, हॉटेलमध्ये हुक्का सापडला तर त्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो. त्याला तीन वर्षांपर्यंतची शिक्षा आहे. या कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा हुक्का सापडला तर संबंधित उपाहारगृह, रेस्टॉरंटचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल. तसेच तिसऱ्यांदा हुक्का सापडला तर परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. तिसऱ्यांदा दाखल होणारा गुन्हा हा अजामीनपात्र असेल. तुरुंगात गेल्याशिवाय संबंधितांना भीती वाटत नाही. त्यामुळे वारंवार गुन्हे करणाऱ्यांना अटक करण्याची व्यवस्था करण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे. त्याशिवाय अनेकदा पाटर्य़ांमध्ये हुक्का पुरवला जातो. समाजमाध्यमांवरून अशा पाटर्य़ा आयोजित करण्यात येतात. या पाटर्य़ांमधील हुक्क्याच्या पुरवठादारांवरही याचप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी, हुक्का पार्लरला परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले. सरकारने 2018 साली कायदा करत हुक्का पार्लरवर बंदी आणली होती. त्यानंतर काही हुक्का पार्लर चालक न्यायालयात गेले आणि हर्बल हुक्का विक्री करण्याची परवानगी आणली. या हुक्क्यात तंबाखू नसते, मात्र हर्बल हुक्क्याच्या नावाखाली तंबाखूजन्य हुक्क्याची विक्री होते. पोलीस विभागाने सतर्कता दाखवत गेल्या वर्षी 50 गुन्हे दाखल करत सवा कोटी रुपयांचा माल जप्त केल्याची माहिती कदम यांनी दिली. आमदार संजय केळकर, सुधीर मुनगंटीवार आदींनी यावेळी उपप्रश्न विचारले.