पुण्यात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवरून पायी जाणाऱ्या किंवा वाहनचालकांवर धावून जाणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी आता थेट लक्ष्मीनगर येथील चाळीतील घरात घुसून 88 वर्षीय वृद्ध महिलेचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर, दुसरीकडे चाकण येथील कडाचीवाडी येथे एका चिमुकल्यावर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.
या कुत्र्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चिमुकल्याला या भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः फरफटत नेल्याचा थरकाप उडविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून, ही भटकी कुत्री हल्ला करून अनेकांना जखमी करीत आहेत. पादचारी किंवा दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, आता थेट घरामध्ये शिरून नागरिकांचे लचके तोडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.
आज सकाळी दत्तवाडी परिसरातील लक्ष्मीनगर येथील चाळीत वास्तव्यास असणारे संतोष कुऱ्हाडे यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. घरामध्ये त्यांची वृद्ध आई झोपली होती. कुत्र्याने अचानक घरात प्रवेश करून त्यांच्यावर हल्ला करीत त्यांचे लचके तोडले. यात आजींच्या कपाळाला आणि दोन्ही हातांना कुत्र्याने कडकडून चावा घेतल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती ठिक असल्याचे कुऱ्हाडे यांनी सांगितले.
लक्ष्मीनगर, शाहू कॉलेज परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. रात्री या परिसरातून प्रवास करताना भीतीचे वातावरण असते. वेळोवेळी तक्रार करूनदेखील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, असे कुऱ्हाडे यांनी सांगितले.
चाकणमध्ये चिमुकल्यावर हल्ला
चाकण, कडाचीवाडी येथे पाच भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकल्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.